Thu, Dec 12, 2019 17:30होमपेज › Pune › भिलारेवाडी पाझर तलावात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

भिलारेवाडी पाझर तलावात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

Published On: Aug 13 2019 8:20PM | Last Updated: Aug 13 2019 8:13PM
पुणे : कात्रज/प्रतिनिधी

कात्रज घाट परिसरात असलेल्या भिलारेवाडी पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांपैकी दोघेजण बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. यामध्ये दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर अन्य एक मुलगा पाण्यात न उतरल्यामुळे बचावला. विवेक दीपक कदम (वय.15, रा.माऊलीनगर कात्रज), तुषार शांताराम भांगरे (वय. 15, रा. खोपडेनगर गुजरवाडी) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत, तर करण सुखदेव जाधव (वय 17, रा.जाधव नगर, कात्रज) असे बचावलेल्या मुलाचे नाव आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, तिघे मित्र दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीवरून भिलारेवाडी पाझर तलावात पोहण्यासाठी आले होते. मात्र या तिघांमधील करणला पोहता येत नसल्यामुळे तो कडेला थांबला होता. यातील विवेक व तुषार हे दोघे पोहत- पोहत खोल पाण्यात गेले मात्र त्‍यांना पाण्याचा अंदाज न आल्‍याने दोघेही बुडाले. हा तलाव परिसर निर्मनुष्य असल्याने तेथे मदत मिळू शकली नाही.

आपले मित्र बुडाल्यामुळे घाबरलेल्या मित्रांनी भिलारेवाडी येथे जाऊन स्थानिक नागरिकांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार तात्काळ पोलिस, नागरिक आणि  अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावाकडे धाव घेत शोध कार्याला सुरूवात केली. सुरूवातील मुलांचा शोध घेण्यास अडचणी येत होत्या. तसेच अंधार देखील पडत चालला होता. त्यामुळे शोध कार्याची गती वाढवण्यात आली होती. सायंकाळी सात ते साडे सातच्या सुमारास दोन्ही मुलाचे मृतदेह सापडले. यावेळी मुलांचे मृतदेह पाहून घरच्यांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे अनेकांना गहिवरून आले होते. उन्हाळ्यात पाझर तलावातील पाणी क्षमता वाढावी म्हणून गाळ काढणे व रुंदीकरण काम करण्यात आले होते. तसेच परिसरात पाऊस झाल्याने तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता.