Sun, Sep 23, 2018 21:32



होमपेज › Pune › वार करून पंचवीस लाख पळवले

वार करून पंचवीस लाख पळवले

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 03 2018 11:59PM



पिंपरी : प्रतिनिधी 

निगडी, यमुनानगर येथूील एलआयसी ऑफीसमधील पैसे घेवून जात असताना कॅश व्हॅनच्या कर्मचार्‍यावर कोयत्याने वार करून त्याच्याकडील 25 लाख 51 हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास भरदिवसा, वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

महेश पाटणे (रा. हडपसर ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर भाऊसाहेब टकले (38, रा. म्हातोबानगर, कोथरुड) असे व्हॅनचालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यमुनानगर येथील एलआयसी ऑफीसमध्ये पैसे घेण्यासाठी महेश पाटणे आणि चालक टकले हे (एमएच 02, एक्सए 4699) व्हॅन घेवून आले होते. 

पैशाची बॅग व्हॅनमध्ये ठेवत असताना व्हॅन कर्मचारी पाटणे यांच्यावर तेथे आलेल्या चौघांनी कोयत्याने वार केले. त्यांना जखमी करून त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून पळवून नेली. यामध्ये कॅशव्हॅन कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

यमुनानगर एलआयसी ऑफीस आणि इतर दोन बँकाची मिळून अंदाजे 25 लाख 51 हजार रुययांची रोकड चोरट्यांनी पळविली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, एक अ‍ॅक्टिव्हा व पल्सर दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी ही बॅग पळविली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिस आणि वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेल्या प्रकारची माहिती घेवून तपासाच्या दृष्टिने पोलिस पथके रवाना केली. सायंकाळी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. तपास निगडी पोलिस करत आहेत.