Mon, May 27, 2019 08:42होमपेज › Pune › बारामती : जादूटोणा, भानामती करून मानसिक छळ

बारामती : जादूटोणा, भानामती करून मानसिक छळ

Published On: Apr 19 2018 11:15AM | Last Updated: Apr 19 2018 11:15AMबारामती : प्रतिनिधी 

बारामती तालुक्यातील कुतळवाडी नजिक चोरमले वस्ती येथे जादू टोण्यासह भानामती करून मानसिक छळ केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. येथील धनगर समाजात एक कुटुंब गेली दोन वर्षांपासून या दहशतीखाली वावरत आहे. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. येथील स्थानिक देवऋषींच्या उपद्व्यापामुळे हे कुटुंबाला त्रास होत असल्याची तक्रार देण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुपे गावापासून जवळच असलेल्या चोरमले वस्ती येथे देवऋषींनी कशाप्रकारे हा उद्योग केला याचे एक ध्वनिफीत समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गेली शेकडो वर्षांपासून धनगर समाज नेहमीच अशा गोष्टींना महत्त्व देत आला आहे. याचा आपल्या कुटुंबावर विपरीत परिणाम होईल अशी भीती बाळगून असतो. या घटनेचा अचुक फायदा उठवत काही देवऋषीं यांनी समाजात भिती निर्माण केली आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून नामदेव खंडू चोरमले यांनी लाला हिरामण चोरमले, त्याचा भाऊ गुलाब हिरामण चोरमले, धुळा मल्लारी लाकडे व त्याची देवरुषी पत्नी तायाबाई धुळा लाकडे या चारजणांविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ग्रामीण भागातील अशिक्षित समाजाला धार्मिक विधीच्या नावाखाली वेठीस धरण्याचे अनेक प्रकार सतत घडत आहेत.

कुतवळवाडी गावातील शेत जमीन गट नंबर ७७६ मध्ये देव ऋषींनी लिंबू ,टाचण्या ,बाहुली, मडके, खडकी चा पुतळा उडीद इत्यादी साहित्य संशयास्पदरीत्या आणुन पुरले. यामुळे चोरमले कुटुंब भीतीच्या सावटाखाली आहे. या प्रकारास जबाबदार असणाऱ्या अनेकांची नावे समोर आले असून पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नावांचा उल्लेख केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी समोर आली आहे. गेली दोन वर्षांपूर्वी असाच एक गुन्हा वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल आहे. येथील घटनेबाबत पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी प्रतिक्रिया नामदेव चोरमले यांनी मीडियाशी बोलताना दिली.