Sat, Jul 20, 2019 14:58होमपेज › Pune › पुण्यात तिहेरी हत्याकांड

पुण्यात तिहेरी हत्याकांड

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 12:39AMपुणे : प्रतिनिधी 

दोन पुरुषांसह एका तेरा वर्षांच्या मुलाचा खून करून, या तिघांचे मृतदेह गणेश पेठेतील नागझरी नाल्यात फेकून दिल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी समोर आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या तिहेरी हत्याकांडामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. 

यातील तेरा वर्षांच्या मुलाची ओळख पटलेली असून, नवीद रफिक शेख (13, नाडे गल्ली) असे त्याचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत बाकीच्या दोन मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. गणेश पेठेतील टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय आणि दूध भट्टीच्या मध्ये असलेल्या नाल्यातील भिंतींना महापालिकेकडून रंग देण्याचे काम सुरू आहे. एक पेंटर तेथे रंगकाम करत होता. त्या वेळी त्याला तेथे एक मृतदेह दिसला. त्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस दाखल झाले. त्यांनी पाहणी केली. त्या वेळी तेथे थोड्याच अंतरावर त्यांना आणखी एक तर, त्याच्याच पुढे तिसरा मृतदेह आढळला.  

हा प्रकार कळताच प्रभारी पोलिस आयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत परिसराची पाहणी केली. फरासखाना पोलिसांनी तीनही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत; तर तिघांच्याही डोक्यात जड वस्तूने प्रहार करून त्यांचा खून केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

नशेतून खून झाल्याचा संशय

खून झालेल्या परिसरात नशा करणार्‍यांचा वावर असतो. या पुलाखाली परिसरातील व्यसनाधीन बसतात. मृतही नशा करत असण्याची शक्यता असून, त्यातूनच त्यांचा खून झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या परिसरातील नशेखोरांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.