Mon, Apr 22, 2019 06:12होमपेज › Pune › झाडांची वेदना मांडण्याचा प्रयत्न

झाडांची वेदना मांडण्याचा प्रयत्न

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 06 2018 12:11AMपिंपरी : प्रतिनिधी

अंघोळीची गोळी संस्था व शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शहरात खिळेमुक्त झाडे अभियान राबवण्यात येत आहे. गेल्या 15 आठवड्यांत 10 पोती खिळे, तारा, पोस्टर्स साठले होते. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कनेक्टींग एनजीओ पीसीएमसी व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या खिळ्यांंचे व  इतर संकलित केलेल्या साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. मंगळवारी (दि.5) चिंचवडमधील जिजाऊ पर्यटन केंद्रात हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 

यावेळी इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाचे समन्वयक डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह महापौर नितीन काळजे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जैवविविधता समिती, वृक्ष प्राधिकरण समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. प्रदर्शनात  झाडांवरील काढण्यात आलेेले खिळे व इतर लोखंडी तारांसह विविध साहित्य ठेवण्यात आले होते. यावेळी जमा केलेल्या खिळ्यांनी व साहित्यांनी झाडांची प्रतिकृती बनवण्यात आली होती. प्रतिकृतीतून झाड आपली वेदना सांगत असल्याचे दाखवण्यात आले होते.  

आबालवृध्दांसह शहरवासीयांनी या प्रदर्शनाला भेट दिली. विशेषतः लहान मुलांनी या झाडांच्या वेदना जाणून घेतल्या. त्यामुळे भविष्यात हे चिमुकले नक्कीच पर्यावरणासंदर्भात जनजागृतीचे काम करतील.  झाडांना जीव असतो. त्यांनाही वेदना होतात. झाडांना चुका (खिळे) ठोकण्याची चूक आपण करत असतो. वैयक्तिक फायद्यासाठी झाडांवर खिळे ठोकणे चुकीचे आहे. त्यामुळे खिळे व इतर वस्तू  झाडांना ठोकू नये, हाच उद्देश या  प्रदर्शनाचा असल्याचे अंघोळीची गोळी संस्थेचे माधव पाटील यांनी सांगितले. 

खिळेमुक्त अभियानातील खिळ्यांचे व इतर लोखंडी साहित्याचे हे पहिलेच प्रदर्शन होते. यापुढे पुणे व मुंबई येथेही प्रदर्शन भरवण्याचा मानस असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी शहरातील सामाजिक संस्थांनी पर्यावरणपूरक वस्तूंची व उपक्रमांची माहिती देणारे स्टॉल्स लावले होते. यात झाडांवर आधारित छायाचित्रे लावण्यात आली  होती. 

शाडूच्या वस्तू व मूर्ती, तसेच पर्यावरणपूरक कागदी व कापडी पिशव्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदशर्र्नाद्वारे जलपर्णीविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी सायकल दान अभियान राबवून डोंगर खोर्‍यातील गरीब गरजू लोकांना सायकल देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संकलित केलेल्या सायकली गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे निसर्गमित्रांनी सांगितले. 
पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष सूर्यकांत मुथियान यांनी यावेळी शहरवासीयांना खिळेमुक्त झाडे अभियानात सामील व्हावे, असे आवाहन केले.