Wed, Apr 24, 2019 19:28होमपेज › Pune › झाडेदेखील बोलू लागणार!

झाडेदेखील बोलू लागणार!

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 25 2018 12:48AMपुणे : प्रतिनिधी 

जगभरातील सहा हजारांहून अधिक भाषा झाडांच्या माध्यमातून बोलत्या करण्याची किमया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साधली जाणार असून, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या आवारात असणार्‍या मोकळ्या जागेत जागतिक भाषा उद्यान साकारण्यात येणार आहे. या उद्यानात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने हवी ती भाषा ऐकता येणार आहेत. त्यासाठी या उद्यानात जवळपास 180 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. उद्यानाच्या कामाला येत्या 28 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

पुण्यात पुढील महिन्यात होणार्‍या लेखकांच्या ’पेन आंतरराष्ट्रीय परिषदे’निमित्त या उद्यानाची संकल्पना पुढे आली असल्याची माहिती मुख्य समन्वयक आणि ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते. परिषदेत जगभरातील सुमारे 80 देशांतून 180 लेखक व भाषातज्ज्ञ सहभागी होणार असून, भारतात ही संख्या 400 च्या घरात आहे.  प्रत्येक झाडाला सेन्सॉर, स्पीकर, संगणकीय प्रणाली बसविली जाईल. या सेन्सरद्वारे विद्यार्थी, नागरिक, संशोधकांना विविध भाषांतील माहिती, कविता, लेखन, साहित्य, संवाद आदी माहिती ऐकायला मिळेल. पेन साउथ इंडिया व विद्यापीठाकडून या उद्यानासाठी खर्च केला जाणार आहे. विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांना भाषांची माहिती होऊन त्यांचे अस्तित्व टिकण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे असे देखील डॉ. देवी यांनी सांगितले. ‘पेन इंटरनॅशनल काँगेस’ हे या वर्षी पहिल्यांदाच भारतात भरणार आहे. हे अधिवेशन भरवण्याची संधी पुण्याला मिळाली असून येत्या 25 ते 29 सप्टेंबर 2018 या कालावधीमध्ये ते होणार आहे. ‘पेन इंटरनॅशनल काँगेस’साठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे ’इंटेलेक्च्युअल पार्टनर’ असेल.

उद्यान खरच अस्तित्वात येणार का...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात औषधी वनस्पतीचे उद्यान होणार, अशी मान्यता मिळाल्यानंतर काही वर्षांनी ते अस्तित्वात आले. त्याची देखभाल करण्याचा प्रश्‍न निर्माण झालेला असतानाच भाषा उद्यानाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे हे उद्यान दिलेल्या कालावधीत पूर्ण होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.