होमपेज › Pune › 360 एक्सप्लोररच्या ट्रेकर्सचा उपक्रम

कळसूबाई शिखरावर केले वृक्षारोपण

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 07 2018 11:20PMपुणे ः प्रतिनिधी

360 एक्सप्लोरर टेकर्स या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील उंच शिखर- कळसूबाई मोहिमेसाठी सोलापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, परभणी, मुंबई या शहरातील 55 ट्रेकर्सनी सहभाग नोंदवला. या मोहिमेमध्ये कळसुबाई शिखरावर वृक्षारोपण करीत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मॉन्सूनच्या आगमानाप्रीत्यर्थ हा ट्रेक आयोजित केला होता. कठीण उभी चढाई परंतु त्याला थंड हवेची साथ, डोंगरातील करवंदाच्या जाळीचा आस्वाद घेत सर्व 
ट्रेकर्स सकाळी 11 वाजता कळसूबाई शिखरावरती पोहचले. 

भारताचा तिरंगा 1646 मीटर उंचीवर फडकावता आल्याचा सर्वांना आनंद होत होता. ही मोहीम युनायटेड नेशनच्या ‘हि फॉर शी’ या गोलसाठी समर्पित करण्यात आली. या मोहिमेत सोलापूरचा 12 वर्षाचा आर्यन दळवी, पूर्वा तावनिया, सिद्धी सोनिमेंडे, समर्थ दरेकर, श्रेयस राव, संतोष फुलारी, संग्रामसिंग बायस या लहान मुलांनी या मोहिमेत सहभागी नोंदवला. उद्योजक आशिष सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला उबाळे तसेच शिक्षा जेटीथोर यांच्या कुटुंबानेही शिखर सर केले. 64 वयाचे सुधीर रत्नपारखी यांनीही सर्वात पुढे जाऊन कळसूबाई शिखरावर तिरंगा फडकवला. सांगली येथील 10 जणांनी प्रथमच कळसूबाई सर करून पावसाळी ट्रेकिंगची सुरवात केली. पुणे येथील खठड अधिकारी अजय ढोके यांनीही आपल्या भावासोबत शिखर सर करून मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली.

कळसूबाई शिखरावर खूप कमी झाडे आहेत ही गोष्ट लक्षात घेऊन 360 एक्सप्लोररच्या रत्ना मोरे यांच्या पुढाकारातून शिखरावर झाडे लावण्याचा कार्यक्रमही घेण्यात आला. या झाडांची निगा राखण्यासाठी पायथ्याशी असलेल्या बारी गावातील काही लोकांशी बोलणी केली असून ती झाडे मोठी झाल्यानंतर अनेक ट्रेकर्सला बसण्यासाठी छान जागा मिळेल, असा विश्‍वास रत्ना मोरे यांनी व्यक्त केला. तर श्रीराम मुलगिरी म्हणाले की, महाराष्ट्राच्या उंचीवर पोहचल्याचा आनंद आहेच; परंतु हे करण्यासाठी शरीरात एक रग लागते. आपल्याला आणखी किती फिट राहाव लागत, हे समजले.