Mon, May 27, 2019 01:33होमपेज › Pune › पुणे पालिकेचे दोन डॉक्टर  निलंबित

पुणे पालिकेचे दोन डॉक्टर  निलंबित

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिच्या मृत्यूप्रकरणी महापालिकेच्या दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधित डॉक्टरांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून सोमवारी मुख्यसभेत स्पष्ट करण्यात आले.
डॉ. मनोज बगाडे आणि डॉ. विजय बडे असे निलंबित करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत.

राजीव गांधी रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या शुगांभी जानकर यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार गुरुवारी घडला. या प्रकरणाचे पडसाद सोमवारी मुख्यसभेत उमटले. मुख्यसभेच्या कामकाजाच्या सुरुवातीस नगरसेविका आश्‍विनी लांडगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राणी भोसले, नंदा लोणकर, अविनाश साळवे या नगरसेवकांनी महिलेच्या मृत्यूप्रकरणी  दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली, तर प्रशांत जगताप, संजय भोसले, अरविंद शिंदे व श्रीनाथ भिमाले यांनी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. 

त्यावर उपआरोग्य अधिकारी अंजली साबणे यांनी दोषी डॉक्टरांवर निलंबनाच्या कारवाईची कार्यवाही सुरू असल्याचा खुलासा केला. मात्र, या संबंधित डॉक्टरांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांच्या डायसमोर येऊन घोषणाबाजी केली. अखेर उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी त्यासंबंधीचे आदेश दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी डॉ. बडे आणि डॉ. बगाडे यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची घोषणा केली.
 

 

 

 

tags : pune news,treatment,pregnant, woman,Two, doctors, suspension, of pune, municipality, 


  •