Sat, Apr 20, 2019 09:52होमपेज › Pune › सोळा कोटी रुपयांचे रक्‍तचंदन पकडले

सोळा कोटी रुपयांचे रक्‍तचंदन पकडले

Published On: Apr 26 2018 1:43PM | Last Updated: Apr 26 2018 1:43PMपिंपरी : प्रतिनिधी 

सातारा येथून मुंबईला बेकायदा अंदाजे सोळा कोटी रुपयांचे 16 टन 200 किलो रक्तचंदन घेऊन जाणारा कंटेनर वाकड पोलिसांनी पकडला. पुनावळे येथे गुरुवारी (दि. 26) सकाळी आठच्या सुमारास वाकड पोलिसांच्या तपासी पथकाने ही कामगिरी करून दोघांना ताब्यात घेतले आहे.

आदिल मोहम्मद खान (रा. मुंबई) आणि आरीवर्गन (रा. चेन्नई) या दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आदिल याचा कंटेनर क्र. (एमएच 43 यू 7240) आहे, तर आरीवर्गन याने आदिल याला भाडे दिले होते, असे प्राथमिक तपासात समोर येत आहे. सातारा येथे दोन ट्रकमधून आदिल याच्या कंटेनरमध्ये हे 10 टन वजनाचे रक्तचंदन भरले होते. मागील बाजूस दारूच्या मोकळ्या बाटल्यांचे बॉक्स लावण्यात आले होते. 

बेकायदा रक्तचंदन घेऊन जाणारा कंटेनर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून येणार असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण स्वामी आणि वाकड पोलिस ठाण्याच्या तपासी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक हरीश माने यांना मिळाली. त्यानुसार उपायुक्त गणेश शिंदे, वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, सुनील पिंजण (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दत्तात्रय लोंढे, उपनिरीक्षक हरीश माने, कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, भैरोबा यादव, धुमाळ, गंभीरे, कुडाळ, नदाफ, बंडू हजारे, नितीन गेंगजे, अशोक दुधावणे व त्यांच्या पथकाने द्रुतगती महामार्गावर सापळा रचला.

सकाळी आठच्या सुमारास कंटेनरचालक पुनावळे येथील ताज ढाबा येथे चहा-नाष्टा करण्यासाठी थांबला होता. त्यावेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. कंटेनर उघडून पाहिला असता, पाठीमागे दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी कसून पाहणी केली असता आतमध्ये रक्तचंदनाचे लाकूड प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेले आढळून आले. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणला. त्यानंतर याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली; तसेच वनविभागाच्या अधिकार्‍यांनाही दिली. वनविभागाचे अधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी आल्यानंतर कंटेनरमधील रक्तचंदनाचे वजन करण्यात आले. 

अंदाजे दहा टन एवढे रक्तचंदन असण्याची शक्यता आहे. बाजारात रक्तचंदनाची  एक कोटी ते एक कोटी चाळीस लाख रुपये टन या भावाने विक्री होते. त्यामुळे याची किंमत किमान साडेबारा ते तेरा कोटी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सातारा येथे कोणत्या वाहनातून रक्तचंदन आणण्यात आले, ते कोठून आणले, मुंबईत कोणाला विक्री केली जाणार होती, यामागे आणखी कोणाचे धागेदोरे आहेत का, यापूर्वी असा माल नेण्यात आला आहे का, याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत या सर्व बाजूने तपास सुरू आहे. तपास वाकड पोलिस करीत आहेत.