Thu, Nov 15, 2018 20:08होमपेज › Pune › पुणे-नगर हायवेवरील वाहतूक विस्कळीत

पुणे-नगर हायवेवरील वाहतूक विस्कळीत

Published On: Aug 25 2018 2:38PM | Last Updated: Aug 25 2018 2:38PMपुणे : प्रतिनिधी

शहरातील चंदनगर बायपास ते वाघोली परिसरात चक्काजाम झाला आहे. त्यामुळे सात ते आठ किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुणे -नगर रस्त्यावरील वाहतूकीच्या विस्कळीतपणामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः पीएमपीएल बस, खासगी वाहन, एसटी महामंडळाच्या अनेक गाड्या वाहतुकीत अडकल्यामुळे प्रवाशांचा दोन तासांपेक्षा अधिक वेळ वाया गेला आहे. 

चंदनगर, वाघोली परिसरात मागील काही दिवसांपासून वाहतूकीचा फज्जा उडत आहे. त्यातच शनिवारी (दि. २५) सकाळी दहा वाजल्यापासून वाहतूक संथगतीने सुरू होती. बेशिस्त वाहनचालक आणि चौकाचौकातील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. 

औद्योगिक कारखाने आणि कंपन्यांना सुटीचा दिवस असल्यामुळे तसेच रक्षाबंधनाच्या सणाला घरी जाणार्‍या प्रवाशांना वाहतुककोंडीला सामोरे जावे लागले. तर सार्वजनिक वाहतूक करणार्‍या पीएमपीएल बसेसला वाहतूक कोंडीमुळे फेर्‍या रद्द करण्याची नामुष्की आली होती. मुंबईहून येणार्‍या बहुतांश वाहनांना वाहतूक कोंडीमुळे इच्छितस्थळी जाण्यास अधिक वेळ वाया घालवावा लागला.