Tue, Jun 18, 2019 21:02होमपेज › Pune › तोरणागडावर उतरताना कोसळून पर्यटक जखमी

तोरणागडावर उतरताना कोसळून पर्यटक जखमी

Published On: Jun 16 2018 6:01PM | Last Updated: Jun 16 2018 6:01PMखडकवासला : वार्ताहर

दुर्गम तोरणागडावरील कोठी दरवाज्यातून खाली उतरताना पाय घसरून पडल्याने प्रतिक राजेभोसले  ( वय ,27 , रा. अहमदनगर) हा पर्यटक गंभीर जखमी झाला. 
गडावरील शिवकालीन मेंगाईदेवी मंदिरा समोरील कोठी दरवाज्याच्या दगडी पायर्‍यावरुन प्रतिक खाली उतरत होता. त्यावेळी चिखलामुळे निसरड्या झालेल्या दगडावरून पाय घसरून तो पंधरा ते वीस फूट खाली कोसळला. त्यांनंतर तो जागीच निपचिप पडला. त्याला उभे राहता येईना. त्यामुळे त्याच्या सोबत असलेले त्याचे मित्र भयभीत झाले. गडावरील पाहरेकरी बापु साबळे व प्रतिक याचा सहकारी विक्रम कालीकर व इतरांनी त्याला पाणी व चहा दिला. त्यानंतर तो सावध झाला. मात्र हाता _  पायांना, शरिराला गंभीर दुखापती झाल्याने तो एकाचजागी पडून आहे.

ही दुर्घटना आज शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर  जखमी प्रतिक राजेभोसले यांस गडावरुन खाली आणण्यासाठी  वेल्हा पोलीस ठाण्याचे  जवान गणेश लडकत तसेच स्थानिक मावळा जवान संघटनेचे कार्यकर्ते सुनील वेगरे, संतोष बोराणे तातडीने गडावर दाखल झाले. खांद्यावर उचलून जखमी प्रतिकला वेल्हे येथे आणण्यात आले. तेथून त्याला रूग्णालयात नेण्यात आले. सध्या तोरणागडाच्या परिसरात  तुरळक पाऊस पडत असल्याने गडावरील मार्ग व गडावर  जाणार्‍या पाऊल वाटा निसरड्या झाल्या आहेत.

धोकादायक मार्ग

तोरणागडाच्या मार्ग पावसाळ्यात धोकादायक बनतात .डोंगर कडे ,बुरूजांच्या दरडी कोसळत असल्याने मार्ग अधिक धोकादायक बनले आहेत.गेल्या आठवड्यात दरडी कोसळल्याने मुख्य वेल्हे मार्गाने गडावर चढ उतार करताना मोठी कसरत करावी लागत आहे.पर्यटकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन वेल्हा पोलीसांनी केले आहे.