Sun, Jul 21, 2019 07:50होमपेज › Pune › आजपासून लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या

आजपासून लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या

Published On: Aug 01 2018 1:33AM | Last Updated: Aug 01 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरू असलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची दखल अद्यापही राज्य सरकारने घेतलेली नाही. त्यामुळे बुधवार, 1 ऑगस्टपासून खासदार, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात होईल. क्रांतिदिनी 9 ऑगस्टपर्यंत हे आंदोलनाचे सत्र सुरू राहणार आहे. राज्य सरकारने मागासवर्ग आयोग अहवाल आणि विशेष अधिवेशन याबाबतची कालमर्यादा लिखित स्वरूपात द्यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत केली. गेल्या वर्षी ऑगस्ट क्रांतिदिनी 20 मागण्यांचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारला सादर केले होते. त्याव्यतिरिक्‍त राज्यभरात ठिकठिकाणी काढलेल्या 58 मोचार्र्ंतील निवेदनेही सरकारकडे उपलब्ध आहेत. मागासवर्ग आयोगाकडून सरकारला अहवाल मिळणार आहे. 

असे असतानाही सरकारकडून मात्र आश्‍वासनाव्यतिरिक्‍त मराठा समाजाच्या हातात काहीही पडलेले नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाची घोषणा केली. परंतु, त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे विशेष अधिवेशनाची कालमर्यादा तसेच मागासवर्ग अहवाल किती दिवसांत उपलब्ध होणार याची ठराविक वेळ लेखी स्वरूपात मराठा समाजाला द्यावी, अशी मागणी कोंढरे यांनी या वेळी केली.

शांततेच आंदोलनाचे आवाहन

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सध्या राज्यभर आंदोलने सुरू आहेत. परंतु, या आंदोलनाला बाहेरील लोकांकडून हिंसक वळण लावून मराठा समाज बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा लोकांनी असले उद्योग त्वरित थांबवावेत. गेल्या  दहा दिवसांत सात जणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आहेत. तरुणांनी आत्महत्यासारखे प्रयत्न न करता शांततेत आंदोलन करावे, असे आवाहनही शांताराम कुंजीर यांनी केले आहे. 

मागण्या मान्य करा, अन्यथा जनआंदोलन अटळ

सरकारने ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले; त्यांना नोकरीच्या वाटा बंद झालेल्या आहेत. तेव्हा त्यांना गुन्हा मुक्‍त करून कल्याणकारी राज्याचा ध्येयवाद अंमलात आणावा; तसेच आंदोलन बदनाम होईल, असे कोणतेही कृत्य मराठा समाजातील युवकांनी करू नये. येत्या 9 ऑगस्टच्या आत सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा दि. 9 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. या वेळी पत्रकार परिषदेला तुषार काकडे, धनंजय जाधव, बाळासाहेब आमराळे, रघुनाथ चित्रे उपस्थित होते. 

चाकणच्या घटनेशी मराठा समाजाचा संबंध नाही

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकण येथे करण्यात आलेल्या आंदोलनानंतर झालेली तोडफोड आणि जाळपोळ या प्रकरणाशी मराठा समाजातील आंदोलकांचा काही संबंध नाही. संबंधित कार्यकर्ते आंदोलन संपवून परतत असताना ही घटना घडली असून, त्यामध्ये उत्तर प्रदेश येथील काही भय्या आणि इंडस्ट्रिजमध्ये असलेल्या काही ठेकेदारांचे लोक सहभागी असल्याचे समोर आलेले आहे. अशा प्रकारे आंदोलनामध्ये घुसणार्‍या लोकांना मराठा समाजाने त्वरित बाजूला करावे, असे आवाहनही मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.