होमपेज › Pune › साडेतीन हजार शालेय मुलींना दातांची समस्या

साडेतीन हजार शालेय मुलींना दातांची समस्या

Published On: Jun 27 2018 1:57AM | Last Updated: Jun 27 2018 12:45AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या शाळांत शिकणार्‍या विद्यार्थिनींची आरोग्यदृष्ट्या तपासणी केली असता त्यांना दातांच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचे आढळून आले आहे. त्याखालोखाल डोळ्यांच्या व अ‍ॅनेमियाच्या समस्या आहेत. महापालिकेने यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान पालिकेच्या 23 हजार विद्यार्थिंनींची आरोग्य तपासणी केली असून त्यातून हे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.  पालिकेच्या आरोग्य विभागाने महापालिकेच्या 307 माध्यमिक शाळांमधील 23 हजार 336 विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी केली. यामध्ये शहरातील वानवडी, बिबवेवाडी, येरवडा, कर्वेनगर, भवानी पेठ, औंध, नगर रस्ता, घोले रस्ता, टिळक रस्ता, विश्रामबागवाडा आदी ठिकाणच्या 

पालिकेच्या सर्व शाळांचा समावेश त्यामध्ये होता. यामध्ये त्यांचे दात, रक्‍तातील हिमोग्लोबिन व डोळे तपासण्यात आले.या तपासणीमध्ये काही धक्‍कादायक निरीक्षणे समोर आली आहेत. तपासणी केलेल्या 23 हजार मुलींपैकी 3 हजार 519 विद्यार्थिनींना दातांच्या विविध समस्या आढळून आल्या. ज्यामध्ये त्यांना दंतचिकित्सेची गरज आहे. तर 1 हजार 178 विद्यार्थिनींना डोळयांचा त्रास असून त्यांना तपासणीची गरज आहे. तर रक्‍तामध्ये प्रमाणापेक्षा कमी हिमोग्लोबिनची कमतरता असणार्‍या (अ‍ॅनेमिया) विद्यार्थिंनींची संख्या 1 हजार इतकी आहे.

टिळक रोड परिसरातील अधिक मुलींना अ‍ॅनेमिया

यामध्ये सर्वाधिक हिमोग्लोबिनची कमतरता असणार्‍या विद्यार्थिनी या टिळक रस्ता परिसरातील शाळेतील आहेत. तर त्यापाठोपाठ विश्रामबाग वाडा परिसर व येरवडा परिसरातील विद्यार्थिंनींमध्येही हे प्रमाण अधिक आहे. येरवडा भागातील 738, नगर रस्त्यावरील 561 विद्यार्थिनींना दंतचिकित्सेची गरज आहे. कर्वेनगर परिसरात राहणार्‍या 227 विद्यार्थिनींना नेत्रचिकित्सेची गरज असल्याचे समोर आले आहे.