Fri, Jul 19, 2019 19:51होमपेज › Pune › व्हॉट्सअ‍ॅपवर बारा दिवसांत तीनशे तक्रारी

व्हॉट्सअ‍ॅपवर बारा दिवसांत तीनशे तक्रारी

Published On: Aug 22 2018 1:23AM | Last Updated: Aug 22 2018 12:46AMपुणे : प्रतिनिधी

पुणे पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. के. व्यंकटेशम यांनी नागरिकांना तक्रार करण्यासाठी जाहीर केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर बारा दिवसांमध्ये तीनशे तक्रारी आल्या आहेत. यात सर्वाधिक तक्रारी या वाहतूक व वैयक्तिक असल्याचे सांगण्यात आले. 

डॉ. के. व्यंकटेशम यांनी 15 दिवसांपूर्वी पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी शहरातील गुन्हेगारी, वाहतूक कोंडी तसेच इतर माहिती जाणून घेतली. तसेच पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे प्रश्‍न सोडविण्यासाठी थेट पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार पाठविण्याचे आवाहन केले होते. या प्रश्‍नांची दखल घेऊन सोडविण्याचे प्रयत्न केले जातील, असेही डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले होते. 

त्यानुसार पोलिस नियंत्रण कक्षाअंतर्गत या व्हॉट्सअ‍ॅपवर येणार्‍या तक्रारी पाहण्यासाठी एका स्वतंत्र पोलिस कर्मचार्‍याची नेमणूक करण्यात आली आहे. पुणे पोलिस नियंत्रण कक्षात ठेवण्यात आलेला कर्मचारी व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेतो. ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे, त्याला ती तत्काळ पाठविली जाते. तसेच महत्त्वाची तक्रार असेल तर ती वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविली जाते.  

8 ऑगस्टपासून 19 ऑगस्टपर्यंत 295 तक्रारी व्हॉट्सअ‍ॅपवर आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 109 तक्रारी या वाहतूक शाखेशी संबंधित आहेत. त्यानंतर 90 तक्रारी या वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत. तसेच ध्वनिप्रदूषण 28, अवैध धंदे 21, बॅग लिफ्टिंंग, चौकशी, ग्रामीण भागातील या तक्रारी आहेत. या तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवून सोडविण्यात आल्या आहेत. या तक्रारी सोडविल्या की नाही, यावर साहायक आयुक्त (कंट्रोल) देखरेख ठेवत आहेत. तसेच एखादी महत्त्वाची तक्रार असेल तर ती वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठविण्यात येते.