Thu, Jun 20, 2019 01:43होमपेज › Pune › पेट्रोल टाकून मित्राला पेटविले

पेट्रोल टाकून मित्राला पेटविले

Published On: Feb 21 2018 1:27AM | Last Updated: Feb 21 2018 1:27AMपुणे : प्रतिनिधी

मित्राच्याच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार नाना पेठेत मध्यरात्री घडला आहे. आर्थिक वादातून ही घटना घडल्याचे समोर आले असून, याप्रकरणी समर्थ पोलिसांनी तिघांना अटक केली. 

रौफ सैफुद्दीन शेख (वय 35, रा. नाना पेठ) हे यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्फराज रज्जाक पिंजारी (वय 23), अबिद गौस शेख (वय 19), अजहर मेहमूद बागवान (वय 19, तिघे रा. नाना पेठ) यांना अटक केली आहे. याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून,  खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रौफ शेख आणि आरोपी पिंजारी, अबिद शेख, बागवान हे नाना पेठ भागात राहायला आहेत. शेख आणि आरोपी मित्र आहेत. त्याने आरोपींकडून काही दिवसांपूर्वी पैसे उसने घेतले होते.  पैसे परत न केल्यामुळे त्यांच्यात वाद झाले होते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शेख आणि त्याचा मित्र नदीम हे निघाले होते. त्यावेळी आरोपींनी शेख आणि नदीमला मारहाण करण्यास सुरुवात केली. नदीमला ट्यूब फेकून मारली. त्यानंतर आरोपींनी एका दुचाकीतून बाटलीत काढलेले  पेट्रोल  शेख यांच्या अंगावर ओतले. शेखच्या अंगावरील कपडे पेट्रोलमुळे भिजले. काडेपेटीतील काडीने शर्ट पेटवून देण्यात आला.  या घटनेत शेख होरपळला. तेथून पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी पकडले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक परवेज शिकलगार तपास करत आहेत.