Tue, Jul 23, 2019 06:55होमपेज › Pune › समाजाला संतांचे विचारच वाचवू शकतात : अण्णा हजारे 

समाजाला संतांचे विचारच वाचवू शकतात : अण्णा हजारे 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

समाजात प्रत्येक व्यक्ती हा संपत्ती जमविण्यासाठी धावत असून त्या माध्यमातून तो सुख व आनंत शोधत आहे. माणसांनी चंचल मनाला लगाम घालावा. भरकटत चाललेल्या या समाजाला संताचे विचारच वाचवू शकतील. शुद्ध आचार, शुद्ध विचार, चारित्र्य, निष्कलंक जीवन आणि त्यागाची भावना हीच संताची शिकवण या समाजात सुख शांती आणून परिवर्तन घडवू शकते, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. 

आळंदी येथील विश्‍वशांती केंद्र, माईर्स एमआयटी आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २२व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अण्णा हजारे बोलत होते. 

यावेळी अण्णा हजारे म्हणाले ‘जगात विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. मात्र, जोपर्यंत मानवाच्या अंतर्मनात अध्यात्म उतरत नाही तो पर्यंत या विज्ञानाचा काहीही उपयोग नाही. अन्यथा विज्ञान विनाशाकडे घेऊन जाईल. तसेच प्राध्यपकांनी शिक्षणाला नोकरी समजण्याऐवजी निष्काम कर्म म्हणून सेवा करावी. त्यांच्या माध्यमातूनच या देशात आदर्श व्यक्तिमत्वाची पिढी तयार होणार आहे. संत ज्ञानेश्‍वरांच्या एका ओवीने समाज परिवर्तन होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे म्हणजे राळेगणसिद्धी येथील क्रांतीकारक बदल. राळेगण सिद्धी येथे ११ वर्षात ९ लाख लोक अभ्यासासाठी आले. तसेच, ५ लोकांनी पीएचडी पूर्ण केली.’ 

या कार्यक्रमात दिलीप वळसे-पाटील यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी दिलीप वळसे-पाटील म्हणाले  ‘शरद पवार हे चालते-बोलते विद्यापीठ आहे. शिक्षण व्यवस्थेतून समाज परिवर्तन कसे करता येईल, ही त्यांची कल्पना आमच्या काळात अंमलात आणली. ज्या सरकारी शिक्षण संस्थेंना ऑटोनॉमी देण्यात आली, त्या संस्था आज प्रगतीचा टप्पा गाठीत आहेत. शिक्षण म्हणजे परिपूर्ण विद्यार्थी, नागरिक व व्यक्तिमत्व निर्माण करण्याचे साधन आहे. स्व. वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असतांना महाराष्ट्रात त्यांनी खाजगी शिक्षण संस्था उघडण्याची परवानगी देऊन सर्वांसाठी शिक्षणाचे द्वार उघडले. आज एमआयटी ने अध्यात्म आणि शिक्षणाची परिभाषा बदलून संपूर्ण जगात नाव लौकिक प्राप्त केला आहे.’ 

यावेळी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, डॉ. मंगेश कराड, प्रा. राहुल कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पांडे व एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के क्षीरसागर आदी उपस्थित होते. पुणेरी पगडी, सन्मानपत्र व ज्ञानेश्‍वर माऊलींची प्रतिमा असे या पुरस्काराचे स्वरूप होते.