Tue, Mar 19, 2019 05:11होमपेज › Pune › शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच

शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 12:50AMपुणे : प्रतिनिधी

शहरात सुरू असणारे घरफोड्यांचे सत्र कायम असून, खडकीत बंगल्यातून चोरट्यांनी तब्बल 25 तोळ्यांचे दागिने आणि रोकड लंपास केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. तर, मंगळवारी वानवडी, हडपसर; तसेच विश्रांतवाडीत घरे फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांमध्ये चोरट्यांनी घरे फोडून लाखो रुपयांचा माल लंपास केला आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांना मात्र घरफोड्यांचा हैदोस थांबविण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. 

विश्‍वजित मित्रा (वय 38, रा. खडकी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्रा यांचा अर्जुन रोडवरील स्टेट बँकेसमोर बंगला आहे. मित्रा हे लष्करात नोकरीस आहेत. ते कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी शिर्डी येथे गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंगला फोडून 25 तोळ्यांचे दागिने; तसेच 25 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ते बुधवारी सकाळी देवदर्शनावरून परत आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यांनी तत्काळ खडकी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. या प्रकरणी खडकी पोलिस तपास करीत आहेत. तर, मंगळवारी वानवडी परिसरातील विजय तुकाराम बधे (वय 56, रा. चिंतामणीनगर, लेन नं. 5, हांडेवाडी रोड) यांचे घर फोडून माल लंपास केल्याचा प्रकार समोर आला. बधे यांची दोन मजली इमारत आहे. इमारतीत प्रवेश करण्यासाठी तळमजल्यावर ग्रील लॉक आहे. ते दुसर्‍या मजल्यावर राहतात. दुसर्‍या मजल्यावर घर असल्याने ते सोमवारी रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवून कुुटुंबासह झोपले होते. 

त्यावेळी चोरट्यांनी उघड्या दरवाजातून आत प्रवेश केला. तसेच, कपाटातून मंगळसूत्र, 1 सोन्याची अंगठी तसेच 3 मोबाईल व 14 हजारांची रोकड असा एकूण 1 लाख 23 हजारांचा माल चोरून नेला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस तपास करीत आहेत. 

हडपसर परिसरातील भेकराईनगरमध्ये चोरट्यांनी भरदिवसा केवळ एक तासात घर फोडून 5 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी सुरेखा रघुनाथ पवार (वय 30, रा. गुरुदत्त कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस तपास करीत आहेत. तर, विश्रांतवाडी भागात धानोरीमधील बंद फ्लॅट फोडून 12 हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. या प्रकरणी अभिराणी सुरेश बाबू (वय 24, रा. धानोरी गाव, कमल लॉन्सजवळ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या आई-वडिलांसह येथे राहण्यास आहेत. त्यांचे आई-वडील नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी घर फोडून माल लंपास केला. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला.