Sat, Sep 22, 2018 03:11होमपेज › Pune › लुटमार आणि सोनसाखळी चोरीने पुणेकर हैराण

लुटमार आणि सोनसाखळी चोरीने पुणेकर हैराण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : पुष्कराज दांडेकर 

व्यावसायिकांना हप्त्याची मागणी करत लुटणे, सहज दुकानात किंवा घरात घुसून रस्त्याने जाणार्‍यांचे मोबाईल हिसकावणे आणि रस्त्यात अडवून लुबाडणार्‍या चोरट्यांनी शहरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याबरोबरच वाढलेल्या घरफोड्यांमुळे त्रस्त झालेले पुणेकर आता लुटमार आणि सोनसाखळी चोरीनेही हैराण झाले आहेत. मागील तीन महिन्यात 81 लुटमारीच्या घटना तर 40 सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी महिला व ज्येष्ठांना विशेषत: लक्ष्य केले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. 

मागील आठवड्यात पुण्यात दोन मोठ्या लुटीच्या घटना घडल्या. एका घटनेत कामगारानेच लुटीचा बनाव केल्याचे उघड झाले. तर दुसर्‍या घटनेत पेट्रोल पंपावरील 27 लाख रुपये लुटल्याची घटना घडली. या प्रकरणात अद्यापही पोलिसांना सुगावा लागलेला नाही. शहरात व्यासायिक, दुकानदारांना धमकावून लुटल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तर पानटपरी, दुकान चालविणार्‍या महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुबाडल्याच्या दोन घटना सलग दोन दिवस हडपसर व सातारा रस्त्यावर घडल्या आहेत. पुण्यात सरासरी दररोज एक लुबाडल्याची घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

पुणे रेल्वे स्थानक परिसरात केक आणण्यासाठी गेलेल्याचा मोबाईल हिसकावला. चार दिवसांपूर्वी स्वारगेट परिसरातील एका पानटपरीचालकाला हप्ता मागत लुटले. त्यानंतर रस्त्यात नागरिकांचे मोबाईल हिसकावण्याचेही प्रकारही उघडकीस आले. मागील अनेक दिवसांपासून चोरटे पुणेकरांच्या कष्टाच्या कमाईवर घरफोडी करून डल्ला मारत आहेत. 

मागील तीन महिन्यात पुण्याच्या मध्यवस्तीसह उपनगरांमध्ये घडलेल्या लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ‘प्रिवेंशन’ हेच ‘डिटेक्शन’ या तत्त्वाप्रमाणे मागील वर्षी सोनसाखळी चोर्‍या कमी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना पकडत गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी केले होते. त्यानंतर पुन्हा सोनसाखळी चोरटे पुण्यात सक्रिय झाले आहेत. तर दिवसेंदिवस लुटण्याच्या घटनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांपुढे आता लुटीच्या गुन्ह्यांच्या तपासाचे आव्हान आहे. 


  •