होमपेज › Pune › भारताच्या नवनिर्मितीचे देखावे मांडा

भारताच्या नवनिर्मितीचे देखावे मांडा

Published On: Aug 13 2017 2:23AM | Last Updated: Aug 13 2017 2:19AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 सालापर्यंत भ्रष्टाचारमुक्त, दहशतवादमुक्त नवभारताच्या निर्मितीचे आवाहन केले आहे. त्यानिमित्ताने यंदाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाचे औचित्य साधून, पुणेकरांनीही नवभारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध व्हावे, तसेच सर्व गणेश मंडळांनी 2022 सालचा नवभारत कसा असेल, याविषयीचे देखावे साकारावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. 

आपल्या संपूर्ण भाषणात भाऊ रंगारी यांचा नामोल्लेख न करता, सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? या वादात पडणे मुख्यमंत्र्यांनी टाळले. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित उपक्रमांचा शनिवारवाडा येथे शुभारंभ करताना फडणवीस बोलत होते. 

महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, खा. संजय काकडे, आ. विजय काळे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, अनिल भोसले, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, आयुक्त कुणाल कुमार, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्यासह पालिकेचे सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक, शहर भाजपचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

या वेळी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्ह, शुभंकर, ध्वज आणि महोत्सवाच्या गाण्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. 

मुख्यमंत्री म्हणाले, 1857 च्या बंडानंतर ब्रिटिशांनी भारतीयांमधील शौर्य, विजिगीषु वृत्ती चिरडून टाकली होती. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून जनतेला संघटित केले. या उत्सवांना सामाजिक रूप देत इंग्रजांविरोधात लढा उभारला. लोकमान्यांनी स्वराज्यासाठी गणेशोत्सव सुरू केला, आता सुराज्यासाठी गणेशोत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. यंदा उत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने चांगली सजावट, रेखीव मूर्ती, सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासोबतच 2022 चा नवभारत कसा असेल, यावर गणेश मंडळांनी देखावे सादर करावे आणि नवभारताचा संकल्प हाती घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. प्रास्ताविक स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी केले, तर उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आभार मानले.

कायदे प्रेमाने पाळा; मुख्यमंत्र्यांची पोलिस आयुक्तांना सूचना

सर्व गणेश मंडळे आपलीच आहेत. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये कायद्याचे पालन करताना गणेश मंडळांसोबत प्रेमाने वागा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांना केली. त्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत जोरदार दाद दिली. मात्र, याचा अर्थ मंडळांनी काहीही करावे, असा होत नाही. त्यांनीही कायद्याचे पालन करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी मंडळांना बजावले. 

वादाला पूर्णविराम द्या : महापौर

गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्यावरून सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम देण्यात यावा.  गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू करण्यात लोकमान्य टिळकांचे असलेले योगदान नाकारता येणार नाही. त्यांच्यासोबत भाऊसाहेब रंगारी, तरवडे, पाटणकर यांनीही दहा दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात योगदान दिले, असे सांगत गणेशोत्सवाच्या जनकत्वावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न महापौर मुक्ता टिळक यांनी केला. सामाजिक बांधिलकी जपणे हा गणेशोत्सवाचा मुख्य हेतू असून, त्यामध्ये सहभागी होण्याबाबत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांना आवाहन करण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.