Mon, May 27, 2019 06:40होमपेज › Pune › स्वावलंबन आरोग्य विमा योजना तडकाफडकी बंद

स्वावलंबन आरोग्य विमा योजना तडकाफडकी बंद

Published On: Mar 24 2018 1:53AM | Last Updated: Mar 23 2018 11:15PMपिंपरी : प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अपंगांसाठी सुरू केलेली स्वावलंबन आरोग्य विमा योजना तडकाफडकी बंद केल्यामुळे, प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिल्लीत भेटून निवेदन देण्यात आले. या वेळी वर्ध्याचे खासदार रामदासजी तडस हेही उपस्थित होते.

याबाबत वेळोवेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने  पाठपुरावा करण्यात आला; परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दिल्लीत जाऊन स्वावलंबन आरोग्य विमा योजना हिस्सा न दिल्याने बंद केली. 

योजनेत लाखो अपंगांनी पैसे भरले आहेत व योजनेचा लाभ न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी अपंगांना देत नाही, हे प्रहारचे राजेंद्र वाकचौरे यांनी मंत्री रामदास आठवले यांच्या निदर्शनास आणून दिले.ही बाब गंभीर असल्याने आठवले यांनी लगेचच (बुधवार, दि.21) सामाजिक न्याय विभागाच्या अधिकार्‍यांबरोबर बैठक घेण्याचे आदेश दिले.

या वेळी प्रहार पिंपरी-चिंचवड अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, रामचंद्र तांबे, अहमदनगर अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, वर्धा अध्यक्ष प्रमोद कुर्‍हाटकर, चांद शेख, संभाजी कुडे, हमीद शेख, सिद्धार्थ उरकुडे, राजेश सावरकर आदी प्रहारचे महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते. 

तत्पूर्वी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या पदाधिकार्‍यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना भेटून आपली व्यथा मांडली. या वेळी सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करून देशातील अपंगांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.

 

Tags : Pimpri, Pimpri News, handicap, health insurance scheme, Prahar Apang Kranti Andolan,