Tue, Jan 22, 2019 20:46होमपेज › Pune › टेम्पो विहिरीत कोसळला

टेम्पो विहिरीत कोसळला

Published On: Jun 03 2018 12:43PM | Last Updated: Jun 03 2018 12:43PMपिंपरी ः प्रतिनिधी

अरुंद रस्त्यावरून जाणारा टेम्पो चालकाला अंदाज न आल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत कोसळला. ही घटना रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास ताथवडे परिसरात घडली. या अपघातातून चालक बाळू काळे मात्र बचावला. 

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे येथील कुमार रेसिडेन्सीकडून पुणे-मुंबई महामार्गाकडे येणारा रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावरून टाटा कंपनीचा 407 मॉडेल टेम्पो (एम एच 14 / सीपी 4803) एका खाजगी कंपनीचा माल भरून जात होता. 

रस्ता अरुंद असून त्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यात त्या रस्त्यावर एक विहीर देखील आहे. विहिरीच्या बाजूने जात असताना चालकाला विहीर आणि रस्ता यांचा अंदाज न आल्याने टेम्पो विहिरीत कोसळला. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच रहाटणी अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात  आले होते. 

अग्निशमन विभागाच्या जवानांनी तत्काळ टेम्पो बाहेर काढला. ही कामगिरी रहाटणी अग्निशमन विभागाचे लिडिंग फायरमन भगवान यमगर, शंकर पाटील, नामदेव वाघे, जयराम कदम, शाहू वनमाने, मारुती गुजर यांच्या पथकाने केली.