Tue, Jan 22, 2019 00:30होमपेज › Pune › फूटपाथवरच्या मुलांसाठी ते झाले शिक्षक !

फूटपाथवरच्या मुलांसाठी ते झाले शिक्षक !

Published On: Sep 05 2018 2:14AM | Last Updated: Sep 04 2018 11:40PMपिंपरी : वर्षा कांबळे

शिक्षकी पेशा नसूनही शिक्षणापासून वंचित असणार्‍या फूटपाथवरच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा विडा काही अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी उचलला आणि ‘ट्री स्कूल इनिशिएटिव्ह’ ग्रुपच्या माध्यमातून झाडाखाली शाळा भरवून या मुलांना संस्कार आणि शिक्षण देण्याचे काम गेली वर्षभर सुरू आहे. बसस्टॉपच्या मागच्या बाजूचा फळा म्हणून वापर करून मुलांना अक्षरओळख करून दिली जात आहे. अशा आगळ्या-वेगळ्या शाळेतून मुलांना शिकण्याचे पाठबळ मिळत आहे. 

‘ट्री स्कूल इनिशिएटिव्ह’ ग्रुपमधील विवेक गुरव, साक्षी शेजवळ, सागर चटर्की, साईनाथ चक्रवर, विशाखा कांबळे हे अभियंते काहीजण शेवटच्या वर्षात शिकत आहेत, तर काही सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात  आठवड्यातील शनिवार आणि रविवारी या मुलांना शिकविण्याचे आणि त्यांच्यावर संस्कार करण्याचे काम सध्या सुरू आहे.  विश्रांतवाडीतील झोपडपट्टीतील 20 ते 25 मुले या शाळेत येतात. संस्कार वर्ग चालविण्यासाठी व्हिडिओ, स्टेशनरी, रंगभरण साहित्य, संस्कार पुस्तिका आदी साधने काही सामाजिक संस्थांकडून पुरविली जातात. वर्षभरात  मुलांमध्ये बराच विकास झाला आहे, असे ग्रुपमधील सदस्य सांगतात. याठिकाणी फक्त अभ्यासच नाही तर मुलांसाठी वेगळे खेळ घेतले जातात, त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. 

नीटनेटके कसे राहिले पाहिजे. दररोज अंघोळ केली पाहिजे. नखे का कापली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले जाते. ही मुले अतिशय अस्वच्छ ठिकाणी राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून घरे स्वच्छ करून घेतली जातात. त्यांच्यासाठी संस्कारवर्ग अ‍ॅक्टिव्हीटीज सुरू केल्या. यामुळे मुलांमध्ये चांगला विकास झाला आहे. मुले आता एबीसीडी, मुळाक्षरे  गिरवू लागली आहेत. न चुकता शाळेत येऊ लागली आहेत.