Wed, Apr 24, 2019 08:14होमपेज › Pune › शिक्षकाने वाचवले वाहून जाणाऱ्या मुलाचे प्राण 

शिक्षकाने वाचवले वाहून जाणाऱ्या मुलाचे प्राण 

Published On: Feb 16 2018 6:51PM | Last Updated: Feb 16 2018 6:50PMओतुर : वार्ताहर

पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यात वाहून जाणाऱ्या मुलाला संत गाडगे महाराज विद्यालयाच्या शिक्षकाने वाचवले. देवेंद्र आनंद जाधव  (वय, ७) असे वाहून जाणाऱ्या मुलाचे नाव आहे. तर, प्रकाश गंगाराम मोधे  असे या मुलाचे प्राण वाचविणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी,  पिंपळगाव जोगा धरण कालव्या शेजारी ऊसतोड़ कामगारांची काही लहान मुले खेळत होती. यावेळी देवेंद्र हा पाय घसरून कालव्यात पडला आणि वहात्या पाण्यात गटांगळ्या खात वाहून जाऊ लागला. ही घटना पाहुन त्या  मुलाचे मित्र घाबरून पळून गेले. तर, जवळच्या उसाच्य शेतात त्याचे आई आणि वडील उस तोडत होते. यावेळी प्रकाश मोधे हे आपल्या शेताकडे दुचाकीवरुन जात असताना ही घटना त्‍यांच्या लक्षात आली. गाडीवरून उतरून त्‍यांनी या मुलाला पाण्यातून बाहेर काढले. 

हे ऊसतोड़ करणारे कुटुंब मूळचे मोढाळ (ता. पारोळ, जि. जळगाव) येथील असून, उसतोड़नीच्या कामानिमित्त सध्या ओतुर परिसरात आहेत. आपल्या एकुलत्या एक मुलाचे प्राण वाचवणाऱ्या शिक्षकाचे कोणत्या शब्दात आभार मानावेत हे त्या दांपत्याला उमगले नाही. मात्र, हे कधीही न फिटनारे ऋण असल्याचे भाव त्यांच्या रडक्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

उस तोड़नीचे काम करताना आपल्या लहान मुलांकडे पालकांचे दुर्लक्ष होते. या कामगारांच्या  हाल अपेष्टा जवळून पहायला मिळतात. त्यांच्या अनेक समस्या आहेत. समाजातील हा घटक अनेक सवलतीपासून वंचित राहिला असून, शासन स्तरावर त्यांचा विचार होने गरजेचे असल्याचे, मत उपस्थित प्रत्यक्षदर्शिनी व्यक्त केले.