Mon, May 27, 2019 00:40होमपेज › Pune › तावडे तमाशा कलावंतांना वेळ देत नाहीत : मंगला बनसोडे

तावडे तमाशा कलावंतांना वेळ देत नाहीत : मंगला बनसोडे

Published On: Jul 04 2018 3:38PM | Last Updated: Jul 04 2018 3:16PMपुणे : प्रतिनिधी 

राज्याची लोककला म्हणून तमाशा कलेला मोठ्या प्रमाणात लोकाश्रय मिळाला;  मात्र म्हणावा तेव्हढा राजाश्रय मिळाला नाही. तमाशा कलावंतांच्या आणि फडांच्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी आम्ही गेली चार वर्षापासून राज्याचे सांस्कृतिक मंत्री म्हणून विनोद तावडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत.  मात्र तावडे वेळ देत नाहीत,  असा आरोप राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे व इतर तमाशा कलावंतांनी केला आहे. 
तमाशा कलावंतांच्या मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलै रोजी नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढून उपोषण करण्याचा इशाराही तमाशा कलावंतांनी दिला आहे. 

तमाशा कलावंत आणि फड मालकांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडण्यायाठी अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या वतीने बुधवारी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी मंगला बनसोडे बोलत होत्या. परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष अविष्कार मुळे, किरणकुमार ढवळपुरीकर, लता पुणेकर, मंदा पाटील यांच्यासह इतर तमाशा कलावंत उपस्थित होते. 

मंगला बनसोडे म्हणाल्या, की तमाशा कला दिवसेंदिवस लोप पावत चालली आहे. या कलेत समाजातील उपेक्षीत घटकातील लोकांचा जास्त समावेश असल्याने शासनाकडून या कलेकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्याची लोककला जिवंत रहावी, यासाठी शासनाने आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे. मराठी चित्रपट, नाटकाला भरीव अनुदान मिळते. मग लोककलाच का दुर्लक्षीत ठेवली जात आहे. आमच्या अडीअडचणी मांडण्यासाठी आम्ही सांस्कृतिक मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे चार वर्षात एकदाही तमाशा कलावंतांना वेळ देऊ शकले नाहीत. जातीवंत कलाकार भिक मागत आहेत. आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असेही बनसोडे म्हणाल्या.

प्रत्येक गावात तमाशा करण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागतात. पोलिसांकडून होणारा त्रास थांबण्यासाठी गृह खात्याने तमाशाला विनामुल्य संरक्षण द्यावे, वाद्य परवाना संपूर्ण हंगामासाठी मिळावा, तमाशा कलेस राजाश्रय मिळायला हवा, पक्ष व संघटना त्रास देतात,  त्यांचा बंदोबस्त करा, खऱ्या तमाशा कलाकारास मानधन मिळत नाही. हे अनुदान योग्य कलाकाराला मिळावे, यासाठी या समितीवर तमाशा कलावंतांना घ्यावे. वर्गीकरन न होता समान मानधन द्यावे,  तमाशा कलावंतांना म्हाडाची घरे द्यावीत. वर्षाला आठ ते नऊ लाख रुपये खर्च फक्त टोलसाठी जातो. त्यामुळे तमाशांच्या गाड्यांना टोलमधून सूट मिळावी, आदी मागण्या यावोळी कलावंतांनी केल्या. 

कलावंतांच्या मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलै रोजी नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढून त्या ठिकाणी उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.