Sun, Jul 21, 2019 14:54
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पुणे : थकित ‘एफआरपी’च्या मागण्यांसाठी स्वाभिमानीचा मोर्चा (Video)

पुणे : थकित ‘एफआरपी’च्या मागण्यांसाठी स्वाभिमानीचा मोर्चा (Video)

Published On: Jun 29 2018 1:05PM | Last Updated: Jun 29 2018 1:10PMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील शेतकर्‍यांच्या ऊसाची एफआरपीची थकित रक्कम अधिक हंगामाच्या सुरवातील 200 रुपये देण्याचे कारखानदारांनी मान्य केलेले आहे. ही रक्कम त्वरित मिळावी आणि राज्य सरकारने दुधाला प्रति लिटरला पाच रुपये अनुदान शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर थेट जमा करावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी मोर्चा काढलेला आहे. येथील अलका टॉकीज चौक ते साखर संकुल असा शेतकर्‍यांच्या मोर्चाला लवकरच सुरुवात होत आहे.

संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी मोर्चाने थोड्याच वेळात साखर आयुक्तालयावर धडक देत आहेत. राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने याठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत.                         

साखर आयुक्तालयाकडील 15 जूनअखेरच्या अहवालानुसार शेतकर्‍यांच्या ऊसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची थकित रक्कम सुमारे पंधराशे कोटी रुपये आहे. ही थकित एफआरपीची रक्कम त्वरीत न दिल्यास साखर आयुक्तांनी कारखान्यांवर महसुल वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीची कारवाई करुन साखरेची रक्कम वसुल करुन द्यावी, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी यापुर्वीच केलेली आहे. 

तर राज्य सरकारने गाईच्या दुधाचा खरेदी दर लिटरला 27 रुपये घोषित केलेला असला तरी सहकारी आणि खासगी दूध व्यावसायिकांकडून होणारी खरेदी सध्या 17 रुपये लिटरपर्यंत खाली आलेली आहे. त्यामुळे थेट अनुदान देण्याची मागणी संघटनेने केलेली आहे. दुग्ध आयुक्त कार्यालयातून मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.