Tue, Apr 23, 2019 00:32होमपेज › Pune › थकित एफआरपी व दुधाच्या अनुदानासाठी २९ जूनला मोर्चा

थकित एफआरपी व दुधाच्या अनुदानासाठी २९ जूनला मोर्चा

Published On: Jun 20 2018 7:11PM | Last Updated: Jun 20 2018 9:50PMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील शेतकऱ्यांच्या उसाची थकित रक्कम त्वरित मिळावी आणि दुधाला प्रति लिटरला 5 रुपये अनुदान मिळावे या दोन मागण्यांसाठी 29 जूनला अलका टॉकीज चौक ते साखर संकुल असा शेतकऱ्यांचा मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.          

मागील चार महिन्यात दुधाचे भाव लिटरला सहा ते सात रुपयांनी कमी झालेले आहेत.  सरकार यामध्ये काहीही करायला तयार नाही. त्यामुळे नुकसान सहन करून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी व्यवसाय किती दिवस करायचा हा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पाच रुपयांचे अनुदान जमा करण्याची आमची मागणी आहे, शेतकऱ्यांना उसाची एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्याचे कारखान्यांनी हंगामाच्या सुरुवातीस मान्य केले होते, ती रक्कम कारखान्यांनी त्वरित द्यावी, असे शेट्टी यांनी यावेळी सांगितले. 

केंद्र सरकारने साखरेची प्रति क्विंटलची किंमत 2900 रुपये निर्धारित केली आहे. त्यामुळे साखरेचे भाव वाढून 2400 रुपयावरून  3000 रुपयांवर स्थिरावले आहेत. कारखान्यांकडे दोन हजार कोटी रुपयांवरून अधिक थकित एफआरपी शेतकऱ्यांना त्वरित द्यावी. अन्यथा साखर आयुक्तालयाने कारखान्यांवर जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांची थकित एफआरपीची रक्कम द्यावी अशी आमची मागणी आहे. याबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. दुग्ध आयुक्तांनाही आम्ही आंदोलन स्थळी निवेदन घेण्यासाठी बोलविले आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. 

राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सेल्फी वूईथ फार्मर अभियानाबाबत छेडले असता ते म्हणाले की, जरूर अभियान राबवा परंतु गाल चोळत परत आल्यावर शेतकऱ्यांच्या भावना कळतील.