Wed, Jun 26, 2019 11:35होमपेज › Pune › रविवारच्या सुट्टीमुळे पवनाथडीला गर्दी

रविवारच्या सुट्टीमुळे पवनाथडीला गर्दी

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 11:28PM

बुकमार्क करा
पिंपरी : सांगवी येथील पी.डब्ल्यू. डी. मैदानावर भरवण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेला रविवारी सुट्टीमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. पहिल्या दिवशीचा अपवाद वगळता दुसर्‍या व तिसर्‍या दिवशी हजारो नागरिकांनी कुटुंबीयांसह वस्तूखरेदीसह विविध खाद्यपदार्थांवर ताव मारला. 

भाकरी, भरीत व मांसाहारी पदार्थांना विशेष मागणी

महिला बचत गटांनी दर वर्षीप्रमाणे यंदाही वेगवेगळे वस्तू व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले आहेत. खासकरून खाण्याचा स्टॉलला शनिवार व रविवारी विशेष गर्दी दिसून आली. शाकाहारीनी भाकरी वांग्याचे भरीत, मासवडी, कोल्हापुरी मिसळ, कोथिंबीर वड्या, खानदेशची स्पेशल ओळख असलेली मांडे, मुगाचे धिरडे यांसह एकापेक्षा एक स्वादिष्ट मांसाहारी पदार्थ ठेवण्यात आले आहेत. रविवारी सुटीचा आनंद घेत खवय्यांनी उस्मानाबादी चिकन, तांबडा रस्सा पांढरा रस्सा, मटण चिकण बिर्याणी,अंडा बिर्याणी, मच्छी फ्राय, यांसह खेकडा बांगडा याबरोबरच उकडीचे मोदक, पेढे, तसेच मिल्कशेक, हुरडा, याबरोबरच पाणीपुरी, चायनीज पदार्थांसह विविध पदार्थांवर ताव मारला.

वस्तूखरेदीबरोबरच सेल्फीचा आनंद

पवनाथडीत विविध कलाकुसरीच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून खासकरून यात लाकडी वस्तूंना विशेष मागणी आहे. यात हॅण्डमेड वूडन ज्वेलरीला महाविद्यालयीन युवतींकडून मागणी आहे. पर्यावरणपूरक वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले असून, यात कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या फाईल्स, एन्व्हलप, तसेच लेटरपॅड, हळदीकुंकवासाठी लागणार्‍या वस्तू, लाकडापासून बनवलेले साहित्य लहान मुलांचे कपडे, तसेच लोकरीचे कपडे, पर्स व  हॅण्डबॅग्ज अशा विविध वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत,  यातील कलाकुसरीच्या ज्वेलरीसह गिफ्ट आर्टिकल्स, तसेच शोभेच्या विविध वस्तूंना नागरिकांकडून मागणी होत असल्याची माहिती बचत गटातील महिलांनी दिली. यंदाही युवावर्गासाठी सेल्फी पॉईंट काढण्यात आले असून, वस्तूखरेदीबरोबरच नागरिक सेल्फीचा आनंद घेत आहेत. शेतकर्‍यांचे पुतळे, ग्रामीण जीवनाचे दर्शन, जागरण गोंधळ येणार्‍या नागरिकांचे सनई चौघड्याने स्वागत, अशा वातावरणात रविवारी नागरिकांनी पवनाथडीचा आनंद लुटला.