Tue, Apr 07, 2020 06:06होमपेज › Pune › स्मृतीवन गेले विस्मृतीत

स्मृतीवन गेले विस्मृतीत

Published On: Dec 09 2017 1:45AM | Last Updated: Dec 09 2017 12:42AM

बुकमार्क करा

पुणे : नेहा सराफ

आपल्या प्रिय माणसांच्या स्मृती जगवण्यासाठी तयार करण्यात आलेले आणि संपूर्ण राज्यात नावाजले गेलेले स्मृतीवन आता पुणे महापालिकेच्याच विस्मृतीत गेल्याचे दिसत आहे. त्यात तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लावलेल्या झाडाचाही समावेश असून हे झाडदेखील वाळण्यास सुरुवात झाली आहे. 

लोकसभागातून वनीकरणात वाढ व्हावी म्हणून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2010मध्ये हा प्रकल्प सुरू केला. त्यावेळी महापालिकेने डहाणूकर टेकडी आणि गणपतीमाथा टेकडी येथे स्मृतीवन तयार केले गेले. मात्र, सध्या या स्मृतिवनाकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. डहाणूकर कॉलनी येथील स्मृतिवनातील झाडे बारीच मोठी झाली आहेत. त्यामुळे त्यांची निगा राखण्यासाठी काहीही करत नसल्याची माहिती येथील कर्मचार्‍याने दिली.

मात्र, या वनात जाण्यापूर्वीच मोठी दुर्गंधी येत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. याशिवाय वनाच्या  खालच्या  भागात लोकवस्ती वाढल्याने पाण्याची कोणतीही सुविधा नाही. गेल्या दोन वर्षांत तर उन्हाळ्यातही पाणी न दिल्याचे या कर्मचार्‍याने सांगितले. गणपती माथा भागातील स्मृतिवन जवळपास कोमेजून गेले आहे. त्याठिकाणी दोन झाडांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून झाडे वाळण्यास सुरुवात झाली आहे. 

इतकेच नाही तर शोभेसाठी लावण्यात आलेले गवतही वाळले असून त्यांचीही काढणी झालेली नाही. मागील वर्षी खत व फवारणी करण्यात आली असली तरी यंदा त्यातील कणही टाकण्यात आलेला नाही. इतकेच नव्हे तर पाणी टाकण्यासाठीचे आळेही करण्यात आले नसून उद्यान विभाग झाडांबाबत अत्यंत उदासीन आहे.