Fri, Apr 26, 2019 17:23होमपेज › Pune › राज्यात यंदा ऊस होणार उदंड!

राज्यात यंदा ऊस होणार उदंड!

Published On: Jun 03 2018 12:22PM | Last Updated: Jun 03 2018 12:22PMपुणे : किशोर बरकाले

चांगला पाऊस, परतीच्या पावसामुळे ऊस पिकाला झालेला फायदा आणि शेतकर्‍यांनी ऊस पिकाची चांगली निगा राखल्यामुळे आयुक्‍तालयाने हेक्टरी सरासरी 80 टन सरासरी उत्पादकता अपेक्षित धरली होती. ती 100 ते 110 टनापर्यंत मिळाल्याचे कारखान्यांच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीतून स्पष्ट झाले आहे.

राज्यात पुढील गाळप हंगामात म्हणजे हंगाम 2018-19 मध्ये तब्बल 1071 लाख टन ऊस उपलब्ध होणार आहे. संपणार्‍या ऊस गाळप हंगाम 2017-18 पेक्षा पुढील वर्षी तब्बल 120 लाख टनांनी उसाची उपलब्धता वाढणार असून, उच्चांकी 110 लाख टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील उजनी आणि मराठवाड्यातील जायकवाडी धरणांच्या लाभक्षेत्रात वाढलेल्या क्षेत्रामुळे ‘बंपर’ ऊस उपलब्धतेची अपेक्षा असल्याची माहिती साखर आयुक्‍तालयातून देण्यात आली.  

राज्यात संपणारा गाळप हंगाम 2017-18 मध्ये 187 कारखान्यांनी मिळून आतापर्यंत 951.69 लाख टन ऊस गाळप पूर्ण केलेले आहे. अद्यापही 4 कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू आहे. साखर आयुक्‍तालयाने सुरुवातीस वर्तविलेल्या अंदाजानुसार एकूण 722 लाख टन ऊस उपलब्धतेतून प्रत्यक्षात गाळपासाठी 650 लाख टन ऊस गाळप अपेक्षित धरण्यात आलेले होते, तर सरासरी 11.30 टक्के उतार्‍यानुसार 73.40 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित होते. या वर्षात 9.02 लाख हेक्टरवरील उसाचे गाळप झालेले आहे, तर येणार्‍या ऊस गाळप हंगामात तब्बल 10 लाख 50 हजार हेक्टरवरील उसाचे गाळप अपेक्षित असून, सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड वाढलेली आहे. हासुध्दा उच्चांक ठरण्याची अपेक्षा आहे. 

राज्यात सर्वच जिल्ह्यांत ऊस लागवड क्षेत्र वाढले आहे. त्यामध्ये उजनी आणि जायकवाडी धरण क्षेत्रातील पाणी उपलब्धतेमुळे ऊस लागवड क्षेत्रात भरीव वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामात चांगल्या पावसाचा अंदाज असून, अन्य पिकांच्या तुलनेत उसाला रास्त आणि किफायतशीर भाव तथा एफआरपीच्या रकमेची शाश्‍वती आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा कल ऊस पिकाकडे वाढला असून, ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या हंगामात विक्रमी ऊस उपलब्ध राहण्याची अपेक्षा  आहे. 
- दत्तात्रय गायकवाड,  साखर सह संचालक (विकास) साखर आयुक्‍तालय