Thu, Apr 25, 2019 23:28होमपेज › Pune › थकीत एफआरपीप्रश्‍नी पाच कारखान्यांवर कारवाई

थकीत एफआरपीप्रश्‍नी पाच कारखान्यांवर कारवाई

Published On: Apr 17 2018 1:12PM | Last Updated: Apr 17 2018 1:21PMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील पाच साखर कारखान्यांनी उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची सुमारे २६४ कोटी रुपये थकित ठेवले आहेत. त्यामुळे संबंधितांवर जप्तीची कारवाई करुन एफआरपीची रक्कम व्याजासह देण्याचे आदेश साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी दिले आहेत. कारवाईचा बडगा उगारण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन आणि सांगलीमधील दोन कारखान्यांचा समावेश आहे. संबंधित दोन्ही जिल्हाधिकार्‍यांनी ही कारवाई करण्याचेही आदेशात नमूद केले आहे. 

हंगाम २०१७-१८ मध्ये थकित एफआरपीप्रश्‍नी कारवाई करण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी (कोल्हापूर), श्री रेणुका शुगर्स संचलित देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी (कोल्हापूर), भोगावती सहकारी (कोल्हापूर) आणि महाकाली सहकारी (सांगली), माणगंगा सहकारी (सांगली) यांचा समावेश आहे.

ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील तरतुदीनुसार कारखान्याने गाळप केलेल्या उसाचे १४ दिवसात किमान एफआरपीची रक्कम ऊस पुरवठादारांना देणे बंधनकारक आहे. ऊस गाळप हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाही एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांना न दिल्यामुळे संबंधित सर्व कारखान्यांच्या सुनावण्या साखर आयुक्तालयात वेळोवेळी घेण्यात आलेल्या आहेत. तरीसुध्दा शेतकर्‍यांच्या उसाच्या एफआरपीची रक्कम दिली गेली नाही. त्यामुळे संबंधित कारखान्यांकडून एफआरपी दराप्रमाणे देयबाकी असलेली रक्कम व त्यावर विहित दराने होणार्‍या व्याजाची रक्कम कारखान्यांकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस इत्यादी उत्पादनाची विक्री करुन रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच आवश्यकतेप्रमाणे कारखान्याच्या स्वतःच्या जंगम व स्थावर मालमत्तेची विहित पध्दतीद्वारे विक्री करुन या रक्कमेतून ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील तरतुदीनुसार देयबाकीची रक्कम खात्री करुन संबंधित ऊस पुरवठादारांना द्यावी, असेही आदेशात पुढे म्हटले आहे.

एफआरपीचे २६४ कोटी १० लाख ९० हजार रुपये थकीत

श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी (कोल्हापूर) या कारखान्याने ११५ कोटी ९२ लाख १३ हजार रुपये, रेणुका शुगर्स संचलित देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी (कोल्हापूर) या कारखान्याने ६२ कोटी ३२ लाख ५९ हजार रुपये, श्री भोगावती सहकारी (कोल्हापूर) ५१ कोटी ६३ लाख ६१ हजार रुपये आणि महाकाली सहकारी (सांगली) २३ कोटी ३ लाख ४२ हजार रुपये तर माणगंगा सहकारी (सांगली) या कारखान्याने ११ कोटी १९ लाख १५ हजार रुपये इतकी एफआरपी दराप्रमाणे रक्कम थकित ठेवल्याचे याबाबत काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. एकूण २६४ कोटी १० लाख ९० हजार रुपये शेतकर्‍यांचे थकित ठेवल्याप्रकरणी आयुक्तालयाने ही कारवाई केली आहे.