Mon, Sep 24, 2018 23:39



होमपेज › Pune › छत्रपती शाहू सेतूचे नाव बदलण्याचा घाट

छत्रपती शाहू सेतूचे नाव बदलण्याचा घाट

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 27 2018 1:16AM



पुणे : प्रतिनिधी

कसबा पेठ-शिवाजीनगर तोफखान्यास जोडणार्‍या आणि डेंगळे पुलाशेजारी होत असलेल्या नवीन समांतर पुलास छत्रपती शाहू सेतू हे नाव देण्याच्या प्रस्तावास यापूर्वी महापालिकेच्या नाव समितीने आणि मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. असे असतानाही हे नाव बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून नाव बदलण्याचे पत्र सत्ताधारी आमदाराने पालिका प्रशासनाला दिले आहे. दरम्यान पुलाच्या नावास मुख्य सभेने मंजुरी दिल्यानंतरही पालिका प्रशासनाकडून दुसर्‍या नावाचे पत्र कसे स्वीकारले गेले, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का, असे प्रश्‍न प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मुठा नदीवरील डेंगळे पुलाचे आयुष्य लक्षात घेऊन आणि या पुलावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी या पुलास समांतर असा नवीन पूल करण्यासाठी तत्कालीन नगरसेवक अजय तायडे यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार कसबा पेठ ते शिवाजीनगर तोफखाना यांना जोडणार्‍या व डेंगळे पुलास समांतर अशा नव्या पुलास मंजुरी मिळाली. या पुलाच्या कामासाठी 23 कोटी रुपये अंदाज पत्रकात तरतूद करण्यास माजी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी मदत केली. या नव्या पुलास छत्रपती शाहू सेतू असे नाव देण्याचा प्रस्ताव तायडे, बोडके, तत्कालिन नगरसेविका निलिमा खाडे, संगीता तिकोणे या चौघांनी 19 जुलै 20116 रोजी नाव समितीला दिला. नाव समितीने या प्रस्तावास 5 ऑगस्ट 2016 रोजी मंजुरी देऊन तो महापालिकेच्या मुख्य सभेत ठेवला. या प्रस्तावास मुख्य सभेनेही 23 ऑगस्ट 2016 रोजी मंजुरी दिली आहे.     

नव्याने साकारणार्‍या या पुलाचे काम पूर्ण होण्यास येत असतानाच या पुलाचे नाव बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पुलास संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार असे नाव देण्याचे पत्र शिवाजीनगरचे आमदार विजय काळे यांनी 15 जून 2018 रोजी पालिका प्रशासनास दिले आहे. या पत्रावर पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देणारे पत्र अतिरिक्त पालिका आयुक्त कार्यालयाने 8 जुलै रोजी नगरसचिव कार्यालय आणि पथविभागास दिले आहे. तसेच या पत्रावर कार्यवाही केली जात असल्याचे पत्र आ. काळे यांना दिले आहे. हा प्रस्ताव नाव समितीसमोर ठेवला जाणार असून यावर नाव समिती काय निर्णय घेते, हे पाहावे लागणार आहे. 

दरम्यान एखाद्या वास्तूच्या नावास पालिकेच्या नाव समितीने आणि मुख्य सभेने मंजुरी दिल्यानंतर पुन्हा त्याच वास्तूस दुसरे नाव न देण्याचे पालिकेचे धोरण आहे. असे असताना दुसरे नाव देण्याचे पत्र पालिका प्रशासन कसे स्वीकारते, यावर पुढील कारवाई करावी, असे आदेश पथ विभागास आणि नगरसचिव कार्यालयास कसे देऊ शकते, पालिकेच्या मुख्य सभेचे निर्णय पालिका अधिकार्‍यांना माहिती नसतात का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  

शाहू महाराजांचे नावास आक्षेप नाही

स्थानिक नागरिकांनी मागणी केल्याने नव्याने होत असलेल्या पुलास संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार असे नाव द्यावे, असे पत्र मी पालिका प्रशासनास दिले आहे. छत्रपती शाहू सेतू असे नाव यापूर्वी मंजूर केले असल्यास त्या नावाला आपला आक्षेप नाही. . 
                              .
- विजय काळे, आमदार, शिवाजीनगर