होमपेज › Pune › प्रेम करुन चुकले; वाढदिनीच केली आत्महत्या

प्रेम करुन चुकले; वाढदिनीच केली आत्महत्या

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 2:15AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च शिक्षण घेणार्‍या तरुणीने वाढदिवसाच्या दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी  दुपारी घडला. 
दरम्यान, पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून, तिने प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. मुलींच्या वसतिगृहातील खोलीत तिने कोणीही नसताना आत्महत्या केली. दरम्यान, या घटनेने विद्यापीठात मोठी खळबळ उडाली असून, वाढदिवसाच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

रेश्मा रवींद्र गायकवाड (22, रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.एसस्सी.च्या दुसर्‍या वर्गात शिक्षण घेत होती. ती विद्यापीठातील तीन क्रमांकाच्या मुलींच्या वसतीगृहातील 50 क्रमांकाच्या खोलीत इतर विद्यार्थिनींसोबत राहत होती. तिच्यासोबत राहणार्‍या विद्यार्थिनी सोमवारी दुपारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी ती एकटीच खोलीवर होती. त्यावेळी तिने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मैत्रिणी परत खोलीवर आल्यानंतर तिने दार न उघडल्याने त्यांनी सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. माहिती मिळताच चतुश्रृंगी पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना या ठिकाणी सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास चतुश्रृंगी पोलिस करत आहेत. 

मी प्रेम करून चुकले...
रेश्मा गायकवाड हिचे एका मुलासोबत प्रेम प्रकरण सुरू होते. मात्र, तो मुलगा तिला त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचे तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. याला कोणालाही जबाबदार धरू नये. दरम्यान, ‘पप्पा मी प्रेम करून चुकले. तुम्हाला भितीपोटी सांगितले नाही. तुम्हाला सांगायला हवे होते. पुढच्या जन्मी तुमच्याच पोटी जन्म घेऊन घेईल. मला माफ करा...’ असेही सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. 

वाढदिवसाच्या दिवशीच आत्महत्या...
रेश्मा हिचा सोमवारी 21 वा वाढदिवस होता. रविवारी रात्री 12 वाजता तिच्या मैत्रिणींने केक कापून वाढदिवस साजरा केला. मात्र, त्यावेळीही ती नाराज होती. त्यानंतर ती फोनवर बोलत असताना सतत रडत होती. सकाळी आणि दुपारीही ती फोनवर बोलत असताना रडत असल्याचे तिच्या मैत्रिणींनी पोलिसांना सांगितले आहे. प्रियकर तिच्याशी नीट बोलत नव्हता. तो सतत चिडचिड करत असल्याचे ती मैत्रिणींना सांगत असे.