Tue, Mar 19, 2019 03:11होमपेज › Pune › संचमान्यतेसाठी १५ जानेवारीची डेडलाइन

संचमान्यतेसाठी १५ जानेवारीची डेडलाइन

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 08 2018 1:14AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

सन 2017-18 च्या संचमान्यतेसाठी या वर्षापुरती 1 जानेवारी 2018 पर्यंत विद्यार्थ्यांची भरलेली माहिती ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची आधार कार्डची अट शिथील करण्यात आली आहे. तसेच सर्वच शाळांना संचमान्यता करण्यासाठी येत्या 15 जानेवारीची डेडलाइन देण्यात आली आहे. 

यासाठी आता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसून दिलेल्या मुदतीतच संचमान्यतेचे सर्व काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.

सन 2017-18 या शैक्षणिक वर्षांची संच मान्यता प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून सर्व शाळा,केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांच्या ‘लॉगिन’मधून दि.15 जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना शाळांमधील शिक्षकांना तसेच संबंधित अधिकार्‍यांना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 

त्यानुसार दि. 1 जानेवारी रोजी जी पटसंख्या विद्यार्थ्यांच्या हजेरी पत्रकावर दिसत होती तीच पटसंख्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. 1 जानेवारीनंतर जर विद्यार्थ्यांची नव्याने नोंद केली असेल तर ते विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच अन्य बदल देखील शिक्षण विभागाकडून संबंधित शिक्षकांना आणि अधिकार्‍यांना कळविण्यात आले आहेत. यासाठी एक कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेत संचमान्यता नेमकी कशी करावी यासाठी काय करणे गरजेचे आहे. याची माहिती देण्यात आली आहे. तसेच येत्या 15 जानेवारीपर्यंत संचमान्यता पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले.