Sat, Jul 20, 2019 23:58होमपेज › Pune › राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह कार्यकर्त्यांवरील खटला मागे?;राज्यसरकारचे पत्र 

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह कार्यकर्त्यांवरील खटला मागे?;राज्यसरकारचे पत्र 

Published On: Jun 12 2018 7:53PM | Last Updated: Jun 12 2018 7:53PMपुणे : प्रतिनिधी 

साखर संकुल येथे तोडफोड केल्याप्रकरणी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, सध्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि कार्यकर्त्यांवर 12 जानेवारी 2015 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासह 141 आंदोलकांवरील दाखल झालेला खटला मागे घेण्यासंदर्भातील राज्यसरकारचे पत्र सरकारी वकीलांनी न्यायालयात सादर केले आहे. यावरील सुनावणी बुधवारी (दि. 13 जून) अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. नाशिककर यांच्या न्यायालयात होणार आहे. 

ऊसाला किमान वाजवी किंमत (एफआरपी) न देणार्‍या साखर कारखानदारांवर कारवाई करा, या मागणीसाठी आंदोलन करणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयाची (साखर संकुल) तोडफोड केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन कार्यकर्त्यांना 12 जानेवारी 2015 रोजी अटक करण्यात आली होती. रात्री उशिरा राजू शेट्टी,  सदाभाऊ खोत यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांची अतिरिक्त न्यायदंडाधिकार्‍यांनी जामिनावर सुटका करण्यात आली होती. 

ऊसदराबाबत चर्चा करण्यासाठी तत्कालीन साखर आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी खा. शेट्टी यांना सोमवारी दुपारी भेटीची वेळ दिली होती. त्यानुसार शेट्टी आले. त्यांच्यासोबत शेकडो शेतकरी होते. या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने पोलिसांनी आधीच बंदोबस्त ठेवला होता. शेट्टी यांनी शेतकर्‍यांसह आयुक्तांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यावर पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत त्याला नकार दिला. त्यामुळे शेट्टी आणि खोत यांनी आंदोलकांसह तिथेच ठिय्या दिला. दुपारी दीड वाजेपर्यंत आंदोलन शांततेत सुरू होते. नंतर एकाएकी काही संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांची सुरक्षा असताना संकुलाच्या मुख्य इमारतीत प्रवेश करून तळमजल्यावरील कार्यालयाची तोडफोड केली होती. यावेळी गाड्यांची तोडफोडही करण्यात आली होती. या आंदोलनात तब्बल 10 ते 12 लाख रूपयांचे नुकसानही झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांवर दंगल आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान आदी कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. 

आंदोलकांवरील दाखल झालेले खटले मागे घेण्यासंदर्भातील मंत्रीमंडळाच्या प्रस्तावानुसार साखर संकुल संकुल तोडफोड प्रकरणाचा हा खटला मागे घेण्यासंदर्भात सुचित करण्यात आले आहे. आंदोलकांवरील खटले मागे घेण्यासंदर्भातील राज्य सरकारचे पत्र न्यायालयात सादर करण्यात आले असून यावरील सुनावणी बुधवारी होणार आहे. याप्रकरणी सरकारी पक्षाचे वतीने अ‍ॅड. एस. सी. शिंदे बाजू मांडणार आहे.