Fri, Feb 22, 2019 22:42होमपेज › Pune › स्टेज कोसळल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

स्टेज कोसळल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

Published On: Sep 05 2018 2:14AM | Last Updated: Sep 05 2018 1:55AMपुणे : प्रतिनिधी 

पुण्यातील  बुधवार पेठेतील विजय-शिवाजी तरुण दहीहंडी मंडळाचे स्टेज कोसळल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. उत्सवानंतर बक्षीस घेण्यासाठी विजयी पथक स्टेजवर आल्यानंतर अचानक झालेल्या गर्दीमुळे स्टेजच कोसळले. यात पाचजण किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारानंतर सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष साईनाथ शांताराम माने (32), उपाध्यक्ष शंकर शिवाजी भोसले (38), कार्याध्यक्ष नवनाथ परदेशी (39) आणि स्टेजचा ठेकेदार दत्ता हेलेकरी (29) यांच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्टेज कोसळल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.

या घटनेत गणेश शेलार (रा. बुधवार पेठ), वसंत कांबळे (रा. शुक्रवार पेठ), आकाश कुसाळकर, सोमनाथ माझिरे (रा. धनकवडी), ओंकार काशीनाथ मालुसरे (रा. रायगड) हे जखमी झाले आहेत. बुधवार पेठेतील शेटे मारुती मंदिराजवळ विजय-शिवाजी तरुण मंडळातर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मंडळाकडून येथे 4 फूट रूंदी आणि 6 फूट लांबीचे स्टेज बांधण्याची परवानगी महापालिकेकडून घेतली होती. मात्र, परवानगीनुसार स्टेज न बांधता याठिकाणी अंदाजे 12 फूट उंच, 15 फूट लांब आणि 15 फूट रूंदीचे स्टेज उभारण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान, दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर याठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणाई जमा झाली होती. अनेक गोविंदा पथकेही दहीहंडी फोडण्यासाठी आले होते, तर स्टेजवर मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्तेही होते. पावणेदहा वाजण्याच्या सुमारास दहीहंडी फुटली. त्यानंतर विजयी पथकाला बक्षीस देण्यासाठी स्टेजवर बोलावण्यात आले होते. त्यावेळी स्टेजवर प्रमाणापेक्षा जास्त गर्दी जमा झाल्याने हे स्टेज कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.