होमपेज › Pune › बंदला दिघीत उत्स्फूर्त प्रतिसाद

बंदला दिघीत उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 26 2018 10:52PMदिघी : वार्ताहर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या बंदच्या आवाहनाला गुरुवारी (दि. 26) दिघीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेल्या आठ दिवसांपासून राज्यभर मराठा आरक्षणाचा भडका उडाला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलने, मोर्चे काढून सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आजपर्यंत मराठा समाजाने अनेक आंदोलने केली. मात्र युती शासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. आता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजाने अधिक आक्रमकपणे राज्यभर आंदोलने सुरू केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिघी बंदचे आवाहन करण्यात आले होते. दिघीकरांनी गुरुवारी शंभर टक्के बंद पाळत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे.

बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिघीमधील सर्व दुकाने, शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. दिघी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात घेण्यात आलेल्या सभेत मृत काकासाहेब शिंदे व  सोनवणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कुठेही अनुचित प्रकार न घडता हा बंद शांततेत पार पडला. मात्र, राज्यभरात आंदोलनाचा उडालेला भडका पाहता दिघीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पुणे-नाशिक मार्गावर मोशीत रास्ता रोको

मोशी : वार्ताहर 

मराठा आरक्षणासाठी सरकारला जाग यावी म्हणून लक्ष वेधण्यासाठी, तसेच काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहत सकल मराठा समाजाच्या वतीने मोशी येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आला. येथील सकल मराठा समाजाने सरकारने आरक्षणाचा मुद्दा त्वरित मार्गी लावावा या मागणीसाठी आदर्शनगर येथून मोर्चा काढत महामार्गावर रास्ता रोको केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर, गणेश आंबेकर, नाना पठारे, कालिदास शिरसाठ, राम खुळे, लक्ष्मण कासार, गणपत सुरवसे, प्रवीण सस्ते, नितीन घारे, मच्छिंद्र गवारे, अमोल विधाटे, किरण शिरसाठ आदी उपस्थित होते.