Wed, May 22, 2019 16:56होमपेज › Pune › ‘आयटी’ला रामराम; रसवंतीचे काम!

‘आयटी’ला रामराम; रसवंतीचे काम!

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 06 2018 1:17AMनवनाथ शिंदे / पुणे : पिढीजात उसाच्या रसवंतीचा व्यवसाय...आई-वडिलांची मुलाला इंजिनिअर करण्याची जिद्द... जिद्दीने इंजिनिअरिंगची पदवी मिळवली, अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या इन्फोसिस कंपनीत रुजूही झाला. ऐशोआरामात सुरू झालेली नोकरी, दिमतीला प्रवासासाठी कंपनीची गाडी, वर्षांला तीन लाखांचे पॅकेज, आठवड्यातून दोन सुट्या असे असतानाही त्याला नोकरीत रस वाटत नव्हता. अखेर सात महिन्यांच्या नोकरीनंतर त्याने राजीनामा दिला अन् थेट परंपरागत ऊस रसवंतीचा व्यवसाय सुरू केला. अक्षय हरिश्‍चंद्र मोरे (वय 26) असे त्या जिद्दी तरुणाचे नाव आहे.

पणजोबांनी ऊस रसवंतीचा सुरू केलेला कुटुंबाचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी अक्षयने चार रसवंतीची दुकाने थाटली. शहरातील स्वारगेट बसस्थानक, पिंपरीतील महानगरपालिका चौक, चाकण फाटा आणि मित्रमंडळ चौकात ही रसवंती गृहे त्याने थाटली. मूळचा दौंड तालुक्यातील केडगावच्या अक्षयने नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्याला वेड्यात काढले. तर काहींनी त्याची तुलना घरगड्याशी केली. पण त्याने मार्चपासून व्यवसायाला सुरुवात केली. महिन्याला 25 हजार मिळविणार्‍या अक्षयने अल्पावधीतच स्व-व्यवसायातून महिन्याची कमाई दोन लाखांवर पोहचविली आहे. त्याला हिणवणार्‍या मित्रांनी त्याची कमाई ऐकून आश्‍चर्य व्यक्त केले. अक्षयने स्वतःबरोबरच आणखी पाच जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येकाला दिवसाकाठी 250 रुपयांची हजेरी दिली जाते.