Sat, Nov 17, 2018 16:26



होमपेज › Pune › स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या जागेचा तिढा सुटला

स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या जागेचा तिढा सुटला

Published On: Dec 18 2017 2:41AM | Last Updated: Dec 18 2017 12:44AM

बुकमार्क करा





पुणे : प्रतिनिधी

स्वारगेट येथील मेट्रो स्टेशनच्या जागेचा अखेर तिढा सुटला आहे. येथील तीन हेक्टर जागा महामेट्रोला देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव येत्या आठवड्यात स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. 

पुणे मेट्रो प्रकल्पाअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी चिंचवड अशा दोन मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी स्टेशन, पार्किंग यासाठी महामेट्रोने महापालिकेकडे सोळा जागांची मागणी केली आहे, मात्र त्यामधील दोन छोट्या जागा वगळता उर्वरित जागा पालिकेने अद्याप मेट्रोला दिलेल्या नाहीत. तसेच वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गावर कोथरूड डेपोच्या जागेवर मेट्रोचा डेपो उभारण्यात येणार आहे. याठिकाणी शिवसृष्टी उभारण्यात यावी, अशी मागणी होत असल्याने या जागेचाही तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यातच मेट्रोने स्वारगेट ते पिंपरी चिंचवड या मार्गावर स्वारगेट येथे मेट्रोचे स्टेशन उभारण्यासाठी जेधे चौकातील जवळपास 5 हेक्टर जागेची मागणी महापालिकेकडे केली होती, मात्र ही जागा पाणीपुरवठा विभागाची असल्याने पाणीपुरवठा विभागाने ही जागा देण्यास विरोध दर्शविला होता, त्यामुळे या जागेबाबतही पेच निर्माण झाला होता, परिणामी, मेट्रोच्या कामात व्यत्यय येण्याची भीती व्यक्त केली जात होती. 

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोला हव्या असलेल्या जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला केल्या होत्या, त्यानुसार स्वारगेटच्या जेधे चौकालगत वॉटर वर्क्सची जी 13 ते 14  एकर जागा आहे. त्यामधील जवळपास अर्धी म्हणजे सात ते साडेसात एकर (3 हेक्टर) जागा मेट्रो स्टेशनसाठी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामधील उर्वरित जागा पाणीपुरवठा विभागासाठी ठेवण्यात येणार आहे. मेट्रोला देण्यात येणारी जागा ही दीर्घकालीन भाडेत्त्वावर देण्यात येणार आहे, त्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. येत्या आठवड्यात होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत यासंबंधींचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, असेही पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.