Sat, Jul 04, 2020 14:41होमपेज › Pune › बारामती : मुलाने केला गोळी झाडून पित्याचा खून

बारामती : मुलाने केला गोळी झाडून पित्याचा खून

Last Updated: Mar 29 2020 3:36PM

संग्रहित छायाचित्रबारामती : पुढारी वृत्तसेवा

कौटुंबिक व संपत्तीच्या वादातून बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे संचालक असलेल्या मुलाने पित्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला आणि स्वतःवरही गोळी झाडून घेतली. या घटनेत धनवंतराव धोडिंबा खोमणे (वय 74, हल्ली रा. सहयोग सोसायटी बारामती, मूळ रा. कोर्‍हाळे बुद्रूक) हे मृत्युमुखी पडले , तर दीपक धनवंतराव खोमणे (वय 48) हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना बारामतीहून पुण्याला खासगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.कोर्‍हाळे (ता. बारामती) येथील खोमणे यांच्या सापिक वस्ती जवळच्या शेतात रविवारी (दि. 29) सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. मृत धनवंतराव हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी धोंडिबा दाजीबा खोमणे यांचे पुत्र होत.

वडीलांचा खून केल्या प्रकरणी मुलगा दिपक यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी खून केल्याचा तसेच स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी सांगितले. याप्रकरणी उदय हरिभाऊ खोमणे यांनी फिर्याद दिली. शेतात तोडलेला ऊस कोणाच्या नावावर घालवायचा, या कारणावरून दिपक यांनी वडीलांच्या डोक्यात गोळी घातली. त्यानंतर स्वतःही डोक्यात गोळी घालत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

खोमणे कुटुंबाची कोर्‍हाळे येथे मोठी शेतजमीन आहे. या शेतजमिनीसंबंधी त्यांच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी सुरू होत्या. सध्या शेतातील ऊसाला तोड आलेली होती. रविवारी हे दोघे पिता-पुत्र शेतातच होते. उसाची खेप कोणाच्या नावे कारखान्याला द्यायची, हे तात्कालीक भांडणाचे कारण ठरल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच दीपक यांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून वडिलांवर गोळी झाडली. त्यानंतर रागाच्या भरात स्वतःच्या डोक्यातही गोळी झाडून घेतली.

दरम्यान, लगतच्या शेतकर्‍यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी लागलीच दोघांनाही बारामतीत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच धनवंतराव हे मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने या घटनेची माहिती घेत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला. खोमणे यांचे निकटचे नातेवाईक असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही तातडीने बारामतीतील रुग्णालयात धाव घेतली. दीपक खोमणे यांना बारामतीतून पुण्याला उपचारासाठी हलविण्यात आले. 

धनवंतराव यांच्यावर सायंकाळी पाचच्या सुमारास कोर्‍हाळे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.धनवंतराव खोमणे यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित आहेत. शिवाय स्वतःच्या व्यवसायात त्यांनी यश मिळविले होते. दीपक खोमणे हे कृषी पदवीधर असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांच्याकडून असे कृत्य घडल्याच्या घटनेवर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. या घटनेनंतर कोर्‍हाळे गावावर शोककळा पसरली.