Wed, May 22, 2019 20:22होमपेज › Pune ›

शहर पोलिस दलाला पैसे खाण्याचा ‘भस्म्यारोग?’
 

शहर पोलिस दलाला पैसे खाण्याचा ‘भस्म्यारोग?’
 

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 1:21AMपुणे :  विजय मोरे 

शहर पोलिस दलातील काही अधिकार्‍यांना पैसे खाण्याचा ‘भस्म्या’ रोग लागलाय की काय ? अशी चर्चा सध्या पोलिस दलातील काही अधिकार्‍यांमध्ये सुरू आहे. हायप्रोफाईल वेश्या व्यवसायात पकडलेल्या दलालांकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल, लॅपटॉपमध्ये आढळलेल्या लब्ध प्रतिष्ठितांंच्या नावांमुळे तपास अधिकार्‍यांना पैशांचा स्त्रोतच मिळाला आहे. तपासाच्या नावाखाली या रंगेल अतिश्रीमंत, लब्ध प्रतिष्ठितांना बोलावून त्यांना ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करू असे धमकावून लाखो रुपयांची तोड केली जात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

शहरातील एका पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकून सप्टेंबर 2017 मध्ये शहर पोलिसांनी हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला होता. त्यानंतर केलेल्या तपासात या रॅकेटमध्ये 23 जणांची नावे निष्पन्न झाली होती. अकरा जणांची धरपकड करण्यात आली. या रॅकेटमधील फरारी आरोपींना मार्च महिन्याच्या  शेवटच्या आठवड्यात अटक करण्यात आली. दरम्यान, सेक्स रॅकेटमधील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्याने शहरातील इतरत्र सेक्स रॅकेट चालविणार्‍या दलालांनी धसका घेतला; मात्र ‘स्पा ब्युटी पार्लर’खाली शहरातील 54 ‘स्पा’मध्ये अजूनही हा धंदा जोरात सुरू आहे. या संदर्भात एका सूत्राने सांगितले की, हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमधील अटक करण्यात आलेल्या दलालांकडून पोलिसांनी जे लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त केले होते त्यामध्ये शहरातील अनेक कॉल रेकॉर्ड झालेले आहेत. त्याची सखोल माहिती काढल्यानंतर हे कॉल रंगेल लब्ध श्रीमंत, प्रतिष्ठांचे असल्याचे उघड झाले आहे. 

रंगेल त्यात श्रीमंत आणि लब्ध प्रतिष्ठितांची नावे उघड झाल्यानंतर तपास अधिकार्‍यांनी वेगळ्याच धर्तीवर तपास करण्यास सुरुवात केली.  प्रथम या लब्धप्रतिष्ठित ‘बकर्‍यां’ना चौकशीसाठी बोलावण्यात आले व तुमची नावे तर उघड करूच; पण तुमच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली जाईल, असे धमकविण्यात आले आहे. यातील अनेक गुलहौसी श्रीमंतांनी अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून थेट तडजोडीची भाषा सुरू केली. मात्र तपास अधिकार्‍याने थेट ‘अर्ध्या खोक्या’ची मागणी केल्यावर हे गुलहौशीही अवाक झाले आणि अखेर 25 पेट्यांवर तडजोड झाल्याची चर्चा आहे.विशेष म्हणजे, शहरातील अनेक गुलहौशी, श्रीमंत लब्धप्रतिष्ठितांचे संभाषण रेकॉर्ड झाले आहे. त्यामुळे अनेकजण तडजोड करण्याच्या रांगेत उभे असल्याचेही या सूत्राने सांगितले. पन्नासपासून सुरुवात होणारा हा आकडा पंचवीसवरच थांबत असल्याचे ‘पचास-पच्चीस’ या आकड्यांची संकेत भाषाच या  गुलहौसीमध्ये सुरू आहे.

Tags : Pune, city police, officials, interested, bribe