Fri, Jul 19, 2019 23:14होमपेज › Pune › जवानाकडून तिघांची गोळ्या घालून हत्या

जवानाकडून तिघांची गोळ्या घालून हत्या

Published On: Jan 17 2018 2:02AM | Last Updated: Jan 17 2018 1:33AM

बुकमार्क करा
दौंड/कुरकुंभ/केडगाव : प्रतिनिधी
दौंड शहरात राखीव पोलिस दलातील आयआरबी या विभागातील जवानाने दोन ठिकाणी केलेल्या गोळीबारात तिघे ठार झाले. मंगळवारी दुपारी भरवस्तीत घडलेल्या प्रकाराने शहरात भीतीचे वातावरण आहे. संजय बळीराम शिंदे असे गोळीबार केलेल्या जवानाचे नाव आहे. गोपाळ काळुराम शिंदे (32), परशुराम गुरुनाथ पवार (30, दोघे रा. वडार गल्ली, दौंड), अनिल विलास जाधव (रा. जिजामातानगर, दौंड) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. 
नगरमोरीजवळ केलेल्या गोळीबारात शिंदे आणि पवार ठार झाले. तर याच माथेफिरूने  जिजामातानगर- कुरकुंभ रोडवरील इच्छापूर्ती बंगल्यात जाधव यांना राहत्या बंगल्यातील गेटसमोर गोळ्या घातल्या.
संजय शिंदे हा भारतीय राखीव दलातील आयआरबीमधील सहायक उपनिरीक्षक आहे. ही तुकडी कोल्हापूर येथील असून तेथे कंपनीच्या तळासाठी जमीन उपलब्ध नसल्याने ही तुकडी दौंड येथील राज्य राखीव दलाच्या पाच आणि सात क्रमांकांच्या तुकड्यांबरोबर दौंड येथे असते. 
या तुकडीचे प्रशासकीय नियंत्रण कोल्हापूर येथील भारतीय राखीव दलाच्या 16 क्रमांकांच्या गटातून होते. शिंदे याच्याकडे तुकडीचा दारूगोळा सांभाळण्याची जबाबदारी होती. त्याला मटका जुगार खेळण्याची सवय होती. त्यासाठी त्याने ठार केलेल्या तिघांकडून उसने पैसे घेतले होते. त्यात तो कर्जबाजरी झाला होता. तिघेही त्याला पैसे मागत होते. त्याला वैतागून शिंदे मंगळवारी सरकारी पिस्तूल आणि गोळ्या घेऊन आला व त्याने तिघांना ठार केले.
या प्रकारानंतर माथेफिरू शिंदे हा त्याच्या राहत्या घरात गोपाळवाडी रस्त्यावरील अथर्व हाइट्स या इमारतीमध्ये लपला असून, त्याच ठिकाणी त्याचे कुटुंबही आहे. या इमारतीभोवती नागरिक मोठ्या प्रमाणात जमले होते. पोलिसही मोठ्या प्रमाणात होते. त्यांनी परिसराची चोहोबाजूने घेराबंदी केली होती.
शिंदेकडे अजून कोणती हत्यारे आहेत, याचा अंदाज पोलिस घेत होते. त्या ठिकाणी पोलिसांनी राज्य राखीव पोलिस दलाची कुमक मागवली होती. तसेच पोलिसांचे अतिजलद प्रतिसाद पथकही (क्यूआरटी) घटनास्थळी होते. 
     शिंदे हा गोळीबार करून आपल्या राहत्या घरी असल्याची अफवा शहरभर पसरल्याने गोपाळवाडी रोडवरील त्याच्या अथर्व इमारतीच्या समोर मोठ्या प्रमाणात गोळीबारात मृत पावलेल्यांचे नातेवाईक हातात बाबू, गज, घेऊन जमा झाले होते. त्या ठिकाणी दौंडचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे आणि त्यांचे पथक वडगाव निंबाळकरचे सहाय्यक निरीक्षक सचिन पाटील, बारामती उपविभागीय अधिकारी बापू बांगर, दौंड शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश मोरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्याबरोबर राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. गोपाळवाडी- दौंड रस्ता पोलिस व जमलेल्या नागरिकांमुळे गर्दीमय झाला होता. रात्री उशिरा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दौंड शहरात भेट देऊन स्थितीची पाहणी केली.
वातावरणामध्ये दहशत निर्माण झाली होती. या वातावरणात संतप्त नातेवाईकांनी पत्रकार छायाचित्रे घेताना संताप व्यक्त केला. छायाचित्रे घेण्यास मज्जव केला. एका बातमीदाराचा त्यांनी मोबाईल फोडून राग व्यक्त केला. घटनास्थळी वातावरण तणावपूर्ण झाले होते. 
मात्र, शिंदे हा सर्वांना चकवा देऊन दौंड शहरातून अहमदनगरकडे पसार झाला होता.   सुमारे पाच तास शिंदेच्या घर परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. शिंदे हा नगरच्या परिसरात फिरत होता.  शिंदेच्या राहत्या घरात तो लपला आहे, असा समज झाल्याने आणि त्याच्याकडे कोणते शस्त्र आहे याचा अंदाज नसल्याने पोलिस खात्याने विशेष पोलिस पथकास पाचरण केले होते. ते घटनास्थळी सायंकाळी 5 :30 च्या दरम्यान आले. दरम्यान शिंदे याचा मोबाईल पोलिस प्रशासनाने ट्रॅप केला असता शिंदे हा नगर- पुणे मार्गावर सुपा टोलनाक्यावर मोबाईल लोकेशन आधारे पकडला गेला असल्याची अतिरीक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांना मिळाली. शिंदे राहत असलेल्या इमारतीची पाहणी करून पोलिसांनी तो तेथे नसल्याची खात्री करून घेतली. मृतांच्या नातेवाईकांना शिंदेला अटक केले असल्याची छायाचित्रे दाखवली. त्यानंतर काही क्षणांत नातेवाईकांना आपला राग कमी करत घटनास्थळावरून निघून गेले. सुमारे सहा तास दौंड शहर भीतीच्या छायेखाली होते.