Tue, Jan 21, 2020 12:22होमपेज › Pune › शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे निधन

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे निधन

Published On: Jul 20 2019 9:46PM | Last Updated: Jul 20 2019 9:56PM
पुणे : प्रतिनिधी

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 86 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे मुलगा प्रसाद, अमृत, मुलगी माधुरी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. शनिवारी रात्री उशीरा त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

निर्मला पुरंदरे जन्म 8 जानेवारी 1933 रोजी बडोद्यात झाला. त्यांनी वनस्थळी या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणासाठी काम केले. 1981 ला त्यांनी वनस्थळी या संस्थेची स्थापना करुन महिलांचे आरोग्य, त्यांचे शिक्षण आणि रोजगारासाठीचे प्रशिक्षण यासाठी काम सुरू केले. सामाजिक काम करताना त्यांनी विविध विषयांवर लेखन देखील केले. स्नेहयात्रा हे त्यांचे प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी असुनही त्यांनी आयुष्यभर स्वतच वेगळं व्यक्तिमत्व आणि लेखन शैली जोपासली.

1957 साली त्यांनी विद्यार्थी सहाय्यक समितीतून कामाला सुरुवात केली. पुरंदरे या प्रसिद्ध माणूस साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर यांच्या भगिनी होत्या. या साप्ताहिकाच्या संपादन विभागात त्यांनी 20 वर्ष काम केले होते. फुलगाव येथे निराश्रित बालकांसाठी  बालसदनाची स्थापना केली. खेडेगावातली पहिली बालवाडी त्यांनी स्थापन केली. शाळाबाह्य तरुणांसाठी त्यांनी सुतारकाम, प्लम्बिंग सारख्या कामांच्या प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले. ’इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट’ या संस्थेतर्फे माणूस घडवण्यासाठी त्या अनेक उपक्रमाचे आयोजन करत असत. त्यांना 24 व्या पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आदिशक्ती पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला.