Fri, Feb 22, 2019 07:25होमपेज › Pune › पुणे : महिलेच्या पोटातून काढला सहा किलोचा गोळा

पुणे : महिलेच्या पोटातून काढला सहा किलोचा गोळा

Published On: Jan 31 2018 7:43PM | Last Updated: Jan 31 2018 7:43PMपुणे: प्रतिनिधी

ससून रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागात बिहारमधील एका महिलेच्या पोटातून तब्बल ६ किलोचा मांसाचा गोळा (ट्युमर) काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. गेल्या पंधरा महिन्यापासून ही महिला ट्युमरसह जगत होती.

मुळच्या बिहार येथील रहिवासी असणाऱ्या ४७ वर्षीय मालतीदेवी अकालू रानू या महिलेला पोट जड वाटणे, पोटात गोळा येणे अशा तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांच्या पोटात प्रचंड वेदना होत होत्या. प्राथमिक उपचारासाठी त्यांना बिहार येथील स्थानिक रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर ससून रुग्णालयात २८ डिसेंबरला दाखल झाल्या असता, सीटी स्कॅन तपासणी दरम्यान पोटात गाठ (रेट्रोपेरिटोनियल ट्यूमर) असल्याचे निदान झाले.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तो पोटातील गोळा आतड्यांना चिकटून होता, तसेच उजव्या किडनीजवळ वाढत होता. शस्त्रक्रियेदरम्यान इतर कोणत्याही अवयवांना इजा न करता गोळा किडनीपासून वेगळा करण्यात आला. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी २ जानेवारीला केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेतून ६ किलोचा ट्यूमर बाहेर काढला. सध्या मालतीदेवी यांची प्रकृती व्यवस्थित आहे.’

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंदनवाले, यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पी.एस. करमरकर यांच्या पथकाने ही दुर्मिळ शस्त्रक्रिया केली. यामध्ये डॉ. लता भोईर, डॉ. मयुरी कांबळे, डॉ. अनिता घुगे, डॉ. केशव जिंदाल, डॉं. गिरीष चौगुले, डॉ. वंदना दुबे यांचा सहभाग होता. भूलतज्ज्ञ डॉ. के .व्ही. कुलकर्णी, गिता मॅथ्यू व प्राजक्ता चव्हाण यांनी सहकार्य केले. 

काय आहे ही शस्त्रक्रिया

‘एक्स्ट्रा गॅस्ट्रो इन्टेंश्नल स्ट्रॉमेंटल ट्यूमर’ जठर किंवा आतड्यांपासून तयार झालेली गाठ हा आजार दुर्मिळ आहे. जगात केवळ ५८ रुग्णांवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाल्याची नोंद आहे. किडनीपासून येणारा ऐवढ्या मोठ्या आकाराचा गोळा आढळून आला नाही.