होमपेज › Pune › राजीव गांधी बस डेपोत प्रवाशांचे हाल

राजीव गांधी बस डेपोत प्रवाशांचे हाल

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 12:13AMबिबवेवाडी : अनिल दाहोत्रे

बिबवेवाडीतील राजीव गांधी बस डेपोमध्ये पावसाच्या पाण्यामुळे परिसर चिखलमय, खुड्यांमुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. डेपो प्रशासनाकडे प्रवशांनी तक्रार करूनसुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे नीलेश कुलकर्णी यांनी सांगितले. 

डेपो परिसरात मुख्य प्रवेशद्वार ते शेडपर्यंत मोठ मोठे खड्डे पडले असून पावसाच्या पाण्यामुळे परिसर चिखलमय झाला आहे. मुख्य रस्त्यावरून बसपर्यंत प्रवाशांना जाता येत नाही. जे तुटके शेड आहे त्यात मोठ्या प्रमाणावर राडारोडा पडलेला आहे. अस्वच्छतेमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आहे. प्रवाशी तक्रारीस गेल्यावर वाहतूक नियंत्रक उडवा उडवीची उत्तरे देत असून कुठे तक्रार करायची ते करा असे सांगत आहेत. डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात असुविधा असून पीएमपीएमच्या संचालकांनी लक्ष घालण्याचे आव्हान तक्रारकर्ते व स्थानिक नागरिक करत आहेत. 

प्रभाग 38 मधील स्थानिक नगरसेवकाकडून डेपोमध्ये विकासकामे अनेक वर्षांपासून न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नीलेश कुलकर्णी यांनी केला आहे. अनेकवेळा आंदोलन करून येथील समस्येवर स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा अधिकारीसुद्धा लक्ष देत नाहीत. नव्याने बांधण्यात आलेल्या डेपोची इमारत बांधून उभी असताना केवळ राजकीय नेत्यांच्या निमंत्रणामुळे प्रवशांना प्रतीक्षा करावी लागत आहे. नवीन इमारती पर्यंतचे डांबरीकरण व डेपोची सुरक्षभिंतीची कामे झालेले नाही. परिणामी डेपोमध्ये खासगी वाहनांची वर्दळ तसेच खासगी वाहनाचा अनधिकृत अड्डा निर्माण झालेला आहे. अनेक अवैधधंदेसुद्धा पोलिसांच्या आशीर्वादाने चक्क डेपोत सुरू आहेत. 

बिबवेवाडी डेपोतून दररोज हजारो प्रवाशी नोकरी धंद्याचे उद्देशाने प्रवास करीत असून अनेकवेळा प्रवाशी संघटनेकडून तक्रारी येऊन सुद्धा डेपोत प्रवशांना नागरी सुविधा मिळत नाहीत. बिबवेवाडी डेपोच्या समस्यांकडे पीएमपीएमचे संचालक व अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन सोयीसुविधा देणेकमी शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचे नीलेश कुलकर्णी यांनी सांगितले. डेपो नियंत्रकांना या असुविधेबद्दल न बोलता  स्वारगेट मुख्यालयाशी संपर्क करण्याचे सांगितले.