Mon, Aug 26, 2019 00:16होमपेज › Pune › देणगी दिलेली चांदीची गदा ६० वषार्र्ंनंतर विद्यापीठात

देणगी दिलेली चांदीची गदा ६० वषार्र्ंनंतर विद्यापीठात

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 12:51AMपुणे ः प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 1958 मध्ये अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय कुस्ती स्पर्धेसाठी चांदीची गदा देणगी स्वरूपात देण्यात आली होती. कुस्तीत चांगली कामगिरी करणार्‍या देशभरातील विद्यापीठांमध्ये ही गदा फिरत्या पारितोषिकाच्या स्वरूपात फिरत आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या कुस्ती संघातील खेळाडूंनी हरियाणातील रोहतक येथे झालेल्या स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळे तब्बल 60 वर्षांनंतर ही गदा पुन्हा विद्यापीठात दाखल झाली आहे. 

विद्यापीठाच्या कुस्ती संघाने रोहतक येथे झालेल्या स्पर्धेत सर्वसाधारण उपविजेतेपद पटकाविले. त्यामुळे विद्यापीठाने देणगी स्वरूपात दिलेली गदा तब्बल 60 वर्षांनंतर विद्यापीठात परत दाखल झाली. सुमारे दहा किलो वजनाची चांदीची ही गदा दिवंगत रा. य. तथा भाऊसाहेब गोखले यांच्या स्मरणार्थ 1958 मध्ये पुणे विद्यापीठाने देणगी म्हणून दिली होती.  

रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठात पार पडलेल्या आंतरविद्यापीठीय स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दहा खेळाडूंचा संघ सहभागी झाला होता. यामध्ये सागर मरकड, तुकाराम शितोळे, अक्षय हिरगुडे, कुमार शेलार, अक्षय चोरघे, अजित शेळके, अक्षय कावरे, तुषार सोनावणे, आदर्श गुंड, राहुल खाणेकर आदींचा समावेश होता. त्यापैकी चार खेळाडूंनी वैयक्तिक पदके पटकावली. 

त्यामध्ये अक्षय हिरगुडे याने 65 किलो गटात रौप्यपदक पटकावले. तसेच, सागर मरकड (57 किलो), तुकाराम शितोळे (61 किलो) आणि अक्षय कावरे (86 किलो) यांनी आपापल्या गटात कांस्यपदक पटकावले. अशाप्रकारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाला सांघिक उपविजेतेपद मिळाले आहे.