होमपेज › Pune › संततधार पावसामुळे सिग्नल यंत्रणा कोलमडली

संततधार पावसामुळे सिग्नल यंत्रणा कोलमडली

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 17 2018 1:23AMपुणे : प्रतिनिधी

शहरात सलग दोन दिवसांपासून कोसळणार्‍या संततधार पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलेले होते. तसेच मध्यवर्ती भागातील काही मुख्य चौकातील सिग्नल बंद पडल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.

मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अल्पावधीतच रस्त्यांवरून पाणी वाहत होते. अशातच शहरातील जुना बाजार चौक, येरवड्यातील गोल्फ चौक, डेक्कन येथील मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याचे आढळून आले. त्यामुळे परिसरातून जाणार्‍या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने दुपारच्या वेळेत चांगलाच जोर धरला. त्यामुळे रस्त्यावर खड्ड्यात पाणी साचून राहिले. शिवाजीनगर, डेक्कन, सेनापती बापट रस्ता, स्वारगेट चौक, अभिनव चौक, टिळक रोड, जुना बाजार रोड, अशा अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. पाण्यामधून वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. 

पावसामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन सोमवारी डेक्कन येथील मुख्य चौकातील सिग्नलसह काही भागातील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याचे आढळून आले. या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमन करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास पीक अवर्समध्ये ऑफिसवरून घरी जाणार्‍यांची संख्या जास्त असते. यामुळे रस्त्यावर गर्दी निर्माण होऊन वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते, ड्रेनेजची कामे अद्यापही सुरू आहेत. या अपूर्ण कामांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.