Sun, May 19, 2019 13:57
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पाणीटंचाईवरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अधिकार्‍यांना कार्यालयात कोंडले

पाणीटंचाईवरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अधिकार्‍यांना कार्यालयात कोंडले

Published On: Aug 04 2018 1:35AM | Last Updated: Aug 04 2018 12:42AMपिंपरी : प्रतिनिधी

पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक वैतागले आहे. या संदर्भात पाणीपुरवठा अधिकार्‍यांना सांगूनही त्यांनी 31 जुलैपर्यंत कोणताही कारवाई केली नाही. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभाग कार्यालयास शुक्रवारी (दि.3) टाळे ठोकून अधिकारी व कर्मचार्‍यांना कोंडले. अखेर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मध्यस्थी करून येत्या 15 दिवसांत पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्याची ग्वाही दिल्याने त्यांची सुटका झाली.  

पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असून, सध्या साठा 95 टक्के आहे. तरीही गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून चिखली, दिघी, चर्‍होली, काळेवाडी, मासुळकर कॉलनी, नेहरूनगर, आकुर्डी, निगडी परिसरात कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे विशेषत: महिला वर्गाची मोठी गैरसोय होत आहे. या संदर्भात सकाळी सहापासूनच नागरिकांच्या असंख्य तक्रारी नगरसेवकांच्या मोबाईलवर येतात. या बाबत तक्रार केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी विविध कारणे देत उडवा उडवीचे उत्तरे देतात. उपाययोजना करून कारवाईसाठी संबंधित विभागास 31 जुलैपर्यंत मुदत दिली होती. मात्र, अधिकार्‍यांनी काहीच काम केले नाही.

त्यामुळे संतप्त राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालिका भवनातील पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभागास दुपारी अडीचच्या सुमारास टाळे ठोकले. आणि प्रवेशद्वाराबाहेर घोषणाबाजी केली. तब्बल तासभर हा प्रकार सुरू आहेत. कार्यालयात पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अय्युब खान पठाण, कार्यकारी अभियंता प्रवीण  लडकत, विशाल कांबळे, इतर अधिकारी व कर्मचारी अडकून पडले होते. त्यात भाजपचे नगरसेवक नामदेव ढाके यांचाही समावेश आहे.   अखेर आयुक्त हर्डीकर घटनास्थळी येऊन विरोधी पक्षनेते व नगरसेवकांची चर्चा केली. त्याचे म्हणणे ऐकून घेऊन येत्या 15 दिवसांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर नगरसेवक शांत झाले आणि अधिकार्‍यांची सुटका झाली. दरम्यान, टाळ्याची चावी सापडत नसल्याने टाळे तोडण्यात आले. 

या संदर्भात विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही अधिकारी उपाययोजना करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी (दि.2) चिखलीतील संपर्क कार्यालयास घेराव घातला. सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी आणि आमदारांचा अधिकार्‍यांवर वचक नसल्याने उपाययोजना केल्या जात नाहीत. अधिकारी त्यांची दिशाभुल करीत आहेत. नियोजनशुन्य कारभार असल्याने ही स्थिती शहरात निर्माण झाली आहे. आयुक्तांनी ग्वाही दिल्याने 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतरही परिस्थितीमध्ये सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.