Sat, Apr 20, 2019 08:19होमपेज › Pune › 'हिंदुत्ववाद आणि नक्षलवादाला कुरवाळू नका' 

'हिंदुत्ववाद आणि नक्षलवादाला कुरवाळू नका' 

Published On: Sep 03 2018 4:57PM | Last Updated: Sep 03 2018 4:57PMपुणे : प्रतिनिधी

विवेकवाद्यांच्या खून प्रकरणी अटकेत असणार्‍यांना निर्दोष ठरवून त्यांना देशभक्त ठरविण्याची घाई हिंदुत्वादी विद्वानांनी करु नये आणि नक्षलवाद हा डावा म्हणून त्याला कुरवाळणार्‍यांचीही हयगय करु नये. अशा शब्दात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी उजवे आणि डाव्यांबाबच्या सद्यस्थितीचा समाचार घेतला.

‘पुढारी ऑनलाईन’शी बोलताना  सबनीस म्हणाले, ‘‘भारतीय समाज मन व समाज व्यवस्था डावे आणि उजवे यात दुभंगली गेली आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नेते त्यांची त्यांची कर्तव्ये त्यांच्या त्यांच्या पध्दतीनुसार करत राहतात. भारतीय समाजाने, महाराष्ट्रीय समाजाने डाव्या उजव्यांकडे आंधळेपणाने समर्पित होण्याचे कारण नाही. दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या करणार्‍या मारेकर्‍यांचा शोध देशातील उच्च अशा पोलिस यंत्रणेने लावलेला आहे. मारेकर्‍यांच्या घरामधून पिस्तुल आणि बॉम्ब यांसारखे स्फोटक शस्त्रास्त्र जप्त केली आहेत. अशा प्रकारची सर्व शस्त्र पोलिस यंत्रणेनीच नियोजनरित्या मारेकर्‍यांच्या घरात टाकून दिलीत आणि घरात कोणीही माणसे नव्हते, अशा प्रकारचा समज करून घेणे, हे विवेकाला शोभणार नाही. शहाणी माणसं या थेरीवर विश्‍वास ठेवणार नाहीत. तेव्हा अशा प्रकारच्या अविवेकी मारेकर्‍यांची पोलिस यंत्रणेमार्फत सबंध चौकशी चालू आहे. त्यांना पोलिस कस्टडी मिळाली आहे. भारतीय न्यायव्यवस्था ही लोकशाहीचे अंग आहे, अविभाज्य भाग आहे. आणि न्यायालयीन प्रक्रियेत हस्तेक्षेप करणे, न्यायालयीन प्रक्रीयेच्या अगोदर हिंदूत्ववादी विद्वानांनी किंवा हिंदूत्ववादी वकिलांनी आरोपींना निर्दोषत्वाचे सर्टीफिकीट देऊन त्यांना देशभक्त ठरविण्याची घाई करणे, अविवेकाचं आणि चुकीचे लक्षण आहे. जसे उजव्या प्रवाहाच्या बाबतीत आहे. तसेच नक्षलवादाशी संबंधित असल्याच्या कारणावरून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्या घरात मोदींच्या खुनाच्या अनुषंगाने अक्षेपार्ह मजकूर सापडल्याचा दावा. जबाबदार पोलिस यंत्रणेने केलेला आहे. अशा परिस्थितीत नक्षलवाद डावा म्हणून कुरवळण्याची गरज नाही.’’   

ते पुढे म्हणाले, ‘‘नक्षलवादी विचार मार्क्सवाद, माओवादावर आधारित आहे. कोणताही विचार हिंसक मानण्याची गरज नाही. वैचारिक स्वातंत्र्याची मुभा भारतीय संविधानाने सर्वांना दिलेली आहे. उजवे आणि डावे आपापल्या शैलीद्वारे आपले विचार स्वातंत्र्य उपभोगू शकतात. त्यांच्यावर बंधन नाही. पण संहारक कृती करण्याची मुभा भारतीय संविधान देत नाही. किंवा हिंसात्मक भाषण करण्याची मुभा देखील संविधान उजव्यांना किंवा डाव्यांना देत नाही. भीमा कोरगाव प्रकरणाचा संदर्भ नक्षलवादाशी जोडताना मधला दुवा म्हणून शनिवार वाड्यासमोर झालेल्या एल्गार परिषदेचा संदर्भ देखील जोडला जात आहे. यामधील सर्व आयोजक, मार्गदर्शक हे सगळेच्या सगले दोषी आहेत, असे मानण्याचे कारण नाही.  कारण त्यामध्ये न्या. पी. बी. सावंतासारखे, न्या. कोळसे पाटलांसारखे डावे विचारवंत सामील आहेत. ते संविधानाच्या चौकटीमध्येच त्यांच्या विचारांची अभिव्यक्ती करीत असतात. पण त्यांना न कळत काही व्यक्ती नक्षलवादाशी संबंधित नाही, अस म्हणण्याचे कारण नाही. तसेच नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधान नसून ते देशाचे पंतप्रधान आहेत. लोकशाहीमध्ये मोदीच नव्हे तर कोणत्याही व्यक्तीच्या हत्येचा कट रचणे लोकशाहीला मारक आहे. हे आव्हान केवळ व्यवस्थेलाच नव्हे तर संविधानाला देखील आव्हान आहे. अशी आव्हाने टोकाच्या उजव्या आणि डाव्या गटातून निर्माण होत असतील तर सामान्य माणसाच्या विकासाच्या शक्यता मारल्या जातात. म्हणून अशा प्रकारची दोन्ही विचारसरणीच्या टोकाची अविवेकी भुमिका घेणार्‍यांना पकडणे, पोलिसांचे कर्तव्य आहे. त्यांना देशभक्त किंवा देशद्रोही म्हणण्याची घाई दोन्ही गटातील लोकांनी करू नये. न्यायालयावर विश्‍वास ठेवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.