Mon, Nov 19, 2018 06:18होमपेज › Pune › शिवसृष्टी अजूनही अंधातरीच 

शिवसृष्टी अजूनही अंधातरीच 

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 12:35AMपुणे : प्रतिनिधी

कोथरूड  येथील कचरा डेपोची 28 एकर जागा महापालिकेने महामेट्रोला सुपूर्द केली. मात्र, या जागेवरील प्रस्तावित शिवसृष्टी प्रकल्पासाठी देण्यात येणार्‍या बीडीपी आरक्षित जागा पालिकेला देण्याबाबत दोन महिने उलटले असताना अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही होऊ शकलेली नाही. त्यामुळे मेट्रो डेपोच्या जागेचा तिढा सुटला असला तरी शिवसृष्टीचा मात्र तिढा कायम आहे. 

पुणे मेट्रो प्रकल्पातील वनाज कोथरूड ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गाचा मेट्रा डेपो कोथरूड येथील कचरा डेपोच्या 28 एकर जागेवर प्रस्तावित केला आहे, मात्र, याच जागेवर महापालिकेने शिवसृष्टीचा प्रकल्प उभारण्यास मंजुरी दिली होती. त्यामुळे या जागेबाबत तिढा निर्माण झाला होता. 

अखेर फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली, त्यात कचर डेपोची जागा महामेट्रोला तर चांदणी चौकालगतची 50 एकर जैववैविध्य उद्यानाची आरक्षित जागा शिवसृष्टी प्रकल्पासाठी देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर लगेचच मुख्यसभेत कचरा डेपोची जागा महामेट्रोला देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यावर प्रशासनाने सर्व प्रकिया पूर्ण करून कचरा डेपोची सर्व्हे न.98, 99 ची 28 एकर जागा जवळपास दोन आठवड्यांपूर्वीच महामेट्रोला सुपूर्द केली आहे. 

मात्र, चांदणी चौकालगतची बीडीपीची 50 एकर जागा शिवसृष्टीला देण्याबाबत कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली होऊ शकलेली नाही. त्यामुळे आगामी काळात या जागेवरून पुन्हा राजकारण रंगण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या मुद्यावरून मेट्रोचे कामातही अडथळा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पालकमंत्र्यांकडून बैठकही नाही

शिवसृष्टी बीडीपीची जागा देताना मुख्यमंत्र्यांनी 23 गावांमधील बीडीपी आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्यावी व त्यामध्ये जो एकमताने निर्णय होईल त्यानुसार शासन कार्यवाही करेल असे स्पष्ट केले होते. मात्र, दोन महिने झाले असतानाही पालकमंत्र्यांनी अद्याप बीडीपीसंबंधीची बैठक घेतलेली नाही.