Fri, Apr 26, 2019 09:22होमपेज › Pune › आयाराम ‘वाल्यां’नीच भाजपचे वस्त्रहरण केले : संजय राऊत

आयाराम ‘वाल्यां’नीच भाजपचे वस्त्रहरण केले : सेना

Published On: Sep 06 2018 8:31PM | Last Updated: Sep 06 2018 8:33PMपिंपरी : प्रतिनिधी

भाजप हा राष्ट्रीय संघ परिवारातून निर्माण झालेला  पक्ष आहे. आत्तापर्यंत त्यानुसारच पक्षाची वाटचाल सुरू होती. त्यांनी जी पाळायला हवीत ती पथ्थ्य निश्‍चितपणे पाळली परंतु, आता तो मूळ भाजप राहीला नाही. सत्तेसाठी कोणालाही पक्षात घेऊन वाल्याचा वाल्मिकी करण्याचे धोरण स्वीकारले गेले. या वाल्यांनीच भाजपचे वस्त्रहरण केल्याची टीका, शिवसेना नेते आणि पुणे विभागीय संपर्कनेते खासदार संजय राऊत यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. महिलांचा अवमान करणा-या भाजपचे आमदार राम कदम यांना विधिमंडळात प्रवेश बंदी केली पाहिजे. त्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात शिवसेना आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार राऊत यांनी पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना पदाधिकार्‍यांची आज (गुरुवारी) बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संपर्कप्रमुख बाळा कदम, महिला संपर्कप्रमुख वैशाली सुर्यवंशी, राज्य संघटक  गोविंद घोळवे, मावळचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला आघाडीच्या शहरसंघटक सुलभा उबाळे आदी उपस्थित होते. 

खा. राऊत म्हणाले, सत्तेसाठी भाजपने दुसर्‍या पक्षातील लोकांचा भरणा केला. हे आयाराम वाचाळगिरी करत आहेत.  पंढरपुरचे भाजप पुरस्कृत विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबाबत केलेले आक्षेपार्ह विधान देशातील जनता अजूनही विसरली नाही. त्याच्या वेदना अजूनही होत आहेत. अहमदनगर महापालिकेचा उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेले वक्तव्य आणि आता भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांनी मुलींबाबत केलेले वादग्रस्त विधान हे सर्व पाहिल्यावर हा अटलजींचा भाजप आहे काय असा प्रश्न पडत आहे. ही प्रवृत्ती वाढत असताना सभ्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण कोणाला घेऊन राजकारण करत आहोत, याचा विचार करणे गरजेचे आहे. 

राम कदम यांनी तमाम महिला भगिनींचा अवमान केला आहे. कायदा करणारेच अशी बाष्फळ बडबड करत असतील तर राज्यातील जनतेने कोणाकडे बघायचे. त्यामुळे केवळ माफी मागून हा प्रश्न भागणारा नाही. कदम यांचे निलंबन करण्यात यावे. निलंबन ठरावाला शिवसेनेचा पाठिंबा असून विरोधकांसह भाजपने देखील त्याला पाठिंबा द्यावा, असेही राऊत म्हणाले.

कदम यांच्यासारख्या लोकप्रतिनीधींना संसद, विधीमंडळात पाठविता कामा नये असे राऊत म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळापेक्षा जास्त भ्रष्टाचार भाजपच्या राजवटीत सुरु आहे. ठेकेदारांच्या पैशांवर निवडणुका लढवून जिंकल्या जात आहेत. ठेकेदारांच्याच हातात राज्य आहे, असा आरोप खासदार राऊत यांनी  केला. मावळ आणि शिरुर दोन्ही मतदार संघातून शिवसेनेच खासदार तर तीनही विधानसभा मतदार संघावर भगवा फडकाविण्याचा निश्चय आहे, असेही ते म्हणाले.

पेट्रोल, डिझेलचे दर दिवसें-दिवस वाढतच आहेत. पेट्रोल १०० पार करण्याच्या मार्गावर आहे. रुपयाचे अवमूल्यन होत आहे. अर्थव्यस्था ढासळली आहे. विरोधात असताना पेट्रोल वाढल्यावर भुमिका घेणारा भाजप आज का शांत आहे, असा सवाल त्यांनी केला.

आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याचा शिवसेनेने नारा दिला आहे. आम्ही तयारी सुरु केली आहे. २०१४ च्या वाळवटीत यश मिळू शकले नाही. परंतु, ते चित्र २०१९ मध्ये नसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला  विधानसभा निवडणूक मुदतपुर्व होणार नाही. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र देखील होणार नसल्याचे सांगत राऊत म्हणाले, जर दोन्ही निवडणुका सोबत आणि विधानसभा मुदतपुर्व झाली तरी त्याला शिवसेनेची तयारी आहे. 

शिवसेनेचे उपनेते हाजी अरफत यांना भाजपने आपल्या कोट्यातून अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्षपद दिले हे दुसर्‍या दिवशी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्पष्ट झाले या फोडाफोडीस शिवसेना उत्तर देणार का असे विचारले असता आम्हीही सांम ,दाम ,दंड भेद राजनीती करू शकतो असे खा. राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुखी खुर्चीतून साम-दाम-दंड-भेदाची भाषा आली. ती भाषा शिवसेना देखील वापरु शकते. आम्ही ती भाषा जनतेच्या हितासाठी वापरत आहोत, असेही राऊत म्हणाले.